अलाहाबाद न्यायालयाचे राहुल गांधींवर ताशेरे
वृत्तसंस्था/प्रयागराज
भारताच्या राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यात आले आहे. तथापि, या स्वातंत्र्यालाही मर्यादा आहेत. त्याचा मनमानी पद्धतीने उपयोग करता येणार नाही, अशा शब्दांमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या भारत जोडो यात्रेत भारतीय सेनादलांसंबंधी अवांछनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात एक याचिका गांधी यांच्याविरोधात सादर करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावर हे ताशेरे ओढले. सेनादलांची अवमानना कोणी करत असेल, तर त्याला घटनेच्या 19 व्या अनुच्छेदाचा लाभ मिळणार नाही. कारण, तसा अधिकार राहुल गांधी यांना नाही, असे न्यायाधीश सुभाष विद्यार्थी यांनी स्पष्ट केले.
समन्सविरोधात याचिका फेटाळली
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी भारताच्या सैन्यदलांची अवमानना केली अशी तक्रार कनिष्ठ न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या तक्रारीच्या संदर्भात कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स पाठविले होते. गांधी यांनी या समन्सला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठासमोर आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची आव्हान याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नाही, तर त्यांना कनिष्ठ न्यायालयासमोर उपस्थित रहावे लागणार आहे. हे प्रकरण लखनौ येथे सादर करण्यात आले आहे.