सर्व आदिवासी नेते येणार एकत्र
कुंकळ्ळीत 25 मे रोजी सर्वजण एकत्र येणार व्यासपीठावर
पणजी : गोव्यातील आदिवासी समाजाचे सर्व नेते आता एकाच झेंड्याखाली येत असून येत्या 25 मे रोजी कुंकळ्ळी येथे प्रेरणा दिन पाळण्यात येणार असून त्याच दिवशीच्या व्यासपीठावर आदिवासी समाजाचे सर्व नेते एकत्र दिसणार आहेत. मडगाव येथे रविवारी एका हॉटेलवर झालेल्या बैठकीत आदिवासी समाजाचे सर्व नेते उपस्थित होते. त्यामध्ये मंत्री, आमदार, सभापती, माजी मंत्री, माजी आमदार असलेले आदिवासी नेते उपस्थित होते.
आपसातील भांडणे नडली
गेल्या काही वर्षात आदिवासी नेत्यांची एकमेकांशी होत असलेली भांडणे पाहता समाज विखुरला गेला आणि त्याचा परिणाम समाजाच्या विकासावर होत राहिला. काही राजकीय नेत्यांनी समाजातील दुफळीचा लाभ उठवला. त्यामुळे त्याचा लाभ यानंतर कोणालाही उठवू द्यायचा नाही, असे ठरवून सर्व नेत्यांनी एकत्रित येण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. बैठकीस कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर, सभापती गणेश गावकर हे दोन नेते उपस्थित होते. गोविंद गावडे हे मात्र काही वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही. आपल्या अडचणीमुळे आपण येऊ शकलो नाही. बैठकीत जो काही निर्णय घ्याल, त्या निर्णयाशी आपण बांधील राहू, असे गोविंद गावडे यांनी कळविले. आदिवासींतर्फे प्रेरणा दिन येत्या 25 मे रोजी कुंकळ्ळी येथे होणार आहे. त्या दिवशी आदिवासींचे शक्तिप्रदर्शन घडविण्याचा देखील इरादा आहे.
एकत्र येण्यामागची भूमिका काय?
बैठकीत सर्व नेत्यांनी आपसातील मतभेद मिटवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यामागील कोणती राजकीय भूमिका आहे? कोणते उद्दिष्ट आहे? हे काही समजू शकले नाही.
येत्या विधानसभा निवडणुकीत आरक्षण हवेच
आदिवासींना राजकीय आरक्षण किमान 12 टक्के मिळणे आवश्यक आहे, याबाबत देखील चर्चा कालच्या बैठकीत झाली. हे आरक्षण डिसेंबरमध्ये होणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेच पाहिजे. यासाठी आदिवासी नेते राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर देखील विशेष प्रयत्न करणार आहेत.