तिलारी घाटातून सर्व वाहतूक बंद
दुरुस्तीचे काम सुरू : आंबोली, चोर्ला घाटमार्गे पर्यायी व्यवस्था
चंदगड : पावसाळ्यात तिलारी घाटातील रस्ता खचल्याने दुरुस्तीचे काम सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे तिलारी घाटातून जाणारी चारचाकी, दुचाकीसह सर्वच वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आल्याची नोंद सर्व वाहनचालकांनी घ्यावी, असे आवाहन चंदगडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. तिलारी घाटमार्गे पणजीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून त्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याच मार्गावरून गेल्या महिन्यात आमदार शिवाजी पाटील हे प्रवास करत होते.
त्यावेळी त्यांनी रस्त्याची पाहणी करून धोकादायक परिस्थितीची प्रशासनाला जाणीव करून दिली होती. हा मार्ग तिलारी घाट क्षेत्रातून जात असल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. अपघात झाला, तर वाहने खोल दरीत कोसळू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. हा मार्ग महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येत आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून तातडीने हे काम पूर्ण करावे, प्रवाशांच्या सुरक्षेतसाठी रस्त्याच्या निसरड्या बाजूला संरक्षण भिंतही उभारण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.
त्या अनुषंगाने चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता काम सुरू करण्यात येणार असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी आणि रस्त्याच्या कामात अडथळा येणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे पत्र दोडामार्ग पोलीस निरीक्षकांना दिले आहे. काम सुरु असताना जीवित वा वित्तहानी होणार नाही, यासाठी तिलारी घाटातील वाहतूक आपल्या स्तरावरून थांबवण्यात यावी, असेही त्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तिलारी घाटातील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी दुपारनंतर तिलारी घाटमाथ्यावर चंदगडच्या बांधकाम विभागाने बॅरीकेट उभारून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे.
गॅबियन भिंत उभारली जाणार
रस्ता कोसळलेल्या ठिकाणी साधारणपणे सात मीटर उंचीची गॅबियन भिंत उभारण्यात येणार आहे. भिंतीची लांबी तेरा मीटर असणार आहे. काम करणारी एजन्सी (ठेकेदार) सांगली येथील आहे. गॅबियन हा एक पिंजरा असतो, जो काँक्रीट, खडक, वाळू आणि मातीने भरलेला असतो. भविष्यात पुन्हा रस्ता कोसळू नये म्हणून गॅबियन भिंत बांधली जाणार आहे. यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस लागणार आहेत.
कोणते मार्ग खुले आहेत
गेल्या काही महिन्यांत तिलारी घाटातून जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. हा रस्ता वाहनांसाठी बंद असल्याने वाहन चालकांना दोडामार्ग, म्हापसा, पणजी, ओल्ड गोवा येथे जाण्यासाठी कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील प्रवाशांना आंबोलीमार्गे, तर बेळगाव, खानापूर, हुबळी, धारवाडच्या प्रवाशांना चोर्ला घाटमार्गे जाता येणार आहे.