महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वकालीन अमीट स्मृतीरेषा!

06:50 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाबराने राम मंदिर उद्वस्थ केले आणि तिथे पाचशे वर्षे बाबरी उभी राहिली. तीस वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर इथे मंदिर उभारणीची परवानगी मिळावी. आता या मंदिरात बाल रूपातील प्रभू श्रीरामांचे प्राणावतरण आनंदात आणि उत्साहात पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेला काळ चक्रावरील सर्वकालिका अमीट स्मृती रेषा असल्याचे म्हटले आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात जरी बाबरीचा विध्वंस झाला असला तरी मंदिराची पुर्नउभारणी ज्या काळात पूर्ण होणार त्या काळातील राज्यकर्त्याच्या कारकीर्दीत हे मंदिर उभे राहिले हाच इतिहास सांगितला जाणार. त्या दृष्टीने लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मूर्ती प्रतिष्ठापना होईल इतपत मंदिराची उभारणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला आहे. या सोहळ्यानेच ते लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील. यावेळी त्यांनी न्यायालयाला न्यायाची बूज राखली म्हणून धन्यवाद दिले. राम आग नाही ऊर्जा आहे आणि राम केवळ आमचे नाही तर सर्वांचे आहेत या त्यांच्या वक्तव्यामागे यापुढे देशात सामाजिक एकोपा कायम राहावा अशी अपेक्षा आहे. शरयू नदीतून या काळात खूप पाणी वाहून गेले. तो काळही वाहून गेला आणि त्या काळाला गाजवणाऱ्या मंडळींपैकी बहुतांश आता स्मृतीशेष राहिले. जे आहेत ते तिथे पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या काळातील वादविवादही आता लयाला जातील असे म्हणण्यास हरकत नसावी. सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्कामोर्तबानंतर चार वर्षातही काळ खूप पुढे गेला आहे. सोमनाथ मंदिराच्या प्रतिष्ठापनेला तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी उपस्थित राहावे की नाही यावर चर्चा घडली होती. तेव्हा त्यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. काळ बदलता बदलता या विषयावर आता चर्चाही घडली नाही. पंतप्रधानांच्या उपस्थितीतच सोहळा होणार हे भारताने मान्य केले होते. तसा तो उत्साहात पार पडला. सर्वकालिक अमीट स्मृती रेषा बनला! ही सुद्धा चर्चा प्रदीर्घ काळ होत राहील. मात्र आता त्याच्यापुढे जाण्याची वेळ आली आहे. राम वाद नव्हे तर तो तोडगा आहे आणि राम आग नाही तर ती ऊर्जा आहे, या उर्जेला जागृत करण्याची वेळ आली आहे. देशाच्या समोर आजची आव्हाने आहेत, ती खूप मोठी आहेत. त्यामुळे आता जाती आणि धर्माच्या वादात अडकून पडता येणार नाही. पण, डोळ्यासमोर घडणाऱ्या घटनांना तरी आपण नाकारू शकत नाही. देशाच्या काही भागात सुरू असणाऱ्या वांशिक हिंसाचारावर भारताला अद्याप तोडगा काढता आलेला नाही. पलीकडे टपून बसलेला चीन या गोष्टीचा फायदा घेण्याचा विचार करत आहे. चिनी सैन्यही आपल्या सीमेवर टपून वेळ येण्याची वाट बघत आहे. दोन पावले पुढे येऊन पुन्हा एक पाऊल मागे गेल्याचे नाटक चीनकडून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराला जागतिक राजकारणातून उत्तर कसे देता येईल याचा विचार राज्यकर्त्यांना करायचा आहे. त्यासाठी निवडणुकीच्या मार्गाने स्थापन होणारे नवे सरकारही आपलेच असले पाहिजे या दृष्टीने रणनीती आखण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप आधीपासून सुरुवात केली आहे. राम मंदिर निर्मिती हा त्यांचा याबाबतीतील मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी पुलवामातील हल्ला आणि त्यानंतर बालाकोट येथे झालेली कारवाई मुद्दा ठरली होती. यावेळी राम मंदिराची उभारणी नरेंद्र मोदी यांना मतांचा वर्षाव करण्यात उपयुक्त ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात वातावरणाची निर्मिती आणि निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंतचे देशातील वातावरण कायमच असेल तर हे शक्यही होईल. पण, जर याहून वेगळे काही वातावरण त्या त्या काळात निर्माण झाले तर ते कसे असेल त्याचा आज अंदाज घेता येत नाही. बालाकोट स्ट्राइक नंतर सुद्धा देशातील विरोधकांची एकजूट असती तर मोदी यांच्या राजवटीला आपण उलटवू शकलो असतो अशी मतांची बेरीज मांडून विरोधकांनी ऐक्य साधण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिराच्या उभारणीनंतर आता या सगळ्या आकडेवारींना आणि नव्या जोडतोडीला कितपत महत्त्व उरते आणि राजकारणात कोणते नवे मुद्दे चर्चेला येतात, की श्री राम मंदिराची उभारणी हा मुद्दा प्रदीर्घकाळ प्रभावी ठरेल ते निवडणुकीच्या वातावरणात दिसून येईलच. आजच्या घडीला तरी देशभर साजरा झालेला सोहळा भाजपने केला नसून तो जनतेने केला आहे असे दाखवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करून आपल्या नेत्यांना या सोहळ्यात पुढे पुढे न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अर्थात मोदी यांच्या हस्तेच प्रतिष्ठापना होणार असल्याने तो एकच ब्रँड देशभर चालेल हा एक महत्वपूर्ण विचार त्यामागे आहेच. पण, भाजपच्या ज्या घटकापर्यंत हा मुद्दा पोहोचला तिथे स्थानिक नेतृत्व आघाडीवर न राहता मागे राहून वातावरण निर्मिती करताना दिसून आला. जिथे हा मुद्दा पोहोचला नाही तिथे तिथल्या नेत्यांनी स्वत:लाही मिरवून घेतले. वैशिष्ट्या असे की, जेथे तुल्यबळ लढती होणार अशी शक्यता आहे, तिथल्या भाजप विरोधी पक्षांनी सुद्धा आपला स्वत:चा आनंद उत्सव वेगळा साजरा केला. म्हणजे त्यांनी मोदींचाच अजेंडा राबवला. त्यासाठी मोठी उलाढाल केली. त्यामुळे अशाप्रकारे राम मंदिराचा मुद्दा दोन्ही बाजूने उचलला जाईल आणि तो परस्परांच्या विषयी वक्तव्य करताना उपयोगात आणला जाईल हे तर स्पष्ट आहे. काँग्रेसने रामनवमीला अयोध्यावारी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने नाशिक येथे काळाराम मंदिरात आपला उत्सव साजरा केला. तेथेच ठाकरे यांनी पक्षाचे शिबीरही आयोजित केले आहे. विरोधक सुद्धा आता हे मुद्दे आपापल्या परीने हाताळत आहेत. त्यामुळे या मंदिर उभारणीचा राजकीय परिणाम काय होतो ते निवडणुकांनंतर समजेलच.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article