आकाशातून निखळल्या तिन्ही चांदण्या...
चिपळूण / राजेंद्र शिंदे :
लहानपणापासून आकाशात उडण्याचे स्वप्न उराशी बाळगताना प्रचंड जिद्द, मेहनत आणि आपल्या कर्तृत्वाच्या आधारे स्वप्नाला गवसणी घालणाऱ्या अपर्णा महाडिक, रोशनी सोनघरे आणि मैथिली पाटील या तिन्ही चांदण्या आकाशातून निखळल्या आहेत. त्यामुळे कोकणच्या नभात अंधार दाटला आहे. गुरुवारी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या क्रू मेंबर्स असलेल्या या तीनही कोकणकन्यांच्या मृत्यूने अवघा कोकण हळहळला आहे.
अहमदाबाद येथून लंडनला जात असलेले एअर इंडियाचे बोईंग 787 ‘ड्रीमलायनर’ प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना गुरुवारी घडली. या भीषण दुर्घटनेत 12 क्रू मेंबरसह बहुतेक सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले. मृत्यूमुखी पडलेल्या या बारा क्रू मेंबरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामेली-भोजनेवाडी येथील अपर्णा महाडिक, मंडणगड तालुक्यातील बुरी गावातील रोशनी सोनघरेसह रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली पाटील या तीन कोकण कन्यांचा समावेश आहे. अपर्णा, रोशनी आणि मैथिली या तिघींचेही कुटुंब हे मुंबईत वास्तव्याला असले तरी त्यांच्या गावाकडे असलेल्या घरामुळे इथल्या मातीशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही.
शालेय जीवनापासूनच हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न या तिघींनीही पाहिलं. त्यादृष्टीने त्यानी अपार मेहनत घेत जिद्दीने पुढे जात, परिस्थितीशी झगडत आपलं स्वप्न साकार केलं. आजला एअर इंडियासारख्या मोठ्या विमान वाहतूक सेवेत कार्यरत राहत आयुष्याची पुढील स्वप्न रंगवणाऱ्या या तिघींच्याही स्वप्नांचा गुरुवारच्या विमान अपघातात पुरता चक्काचूर झाला आहे. कोकणातील मुलांमध्ये असलेले टॅलेंट, त्यांच्यातील जिद्द यामुळे आजला कोकणी युवक-युवती विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. अवघ्या 20-25 वर्षाच्या वयात आपल्या ध्येयासाठी झगडणाऱ्या या तीनही कोकण कन्यांचा विमान दुर्घटनेतील अपघाती मृत्यूने पुरता कोकण हळहळला आहे. हवाई क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणाईसाठी ‘आयडॉल’ असणाऱ्या या तिघींच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

- विनम्रता, व्यावसायिक कार्यक्षमतेसाठी अपर्णाची ओळख
एअर इंडियात गेल्या काही वर्षांपासून क्रू मेंबर म्हणून कार्यरत असणाऱ्या अपर्णा महाडिक या मुंबई-गोरेगाव येथे राहत असल्या तरी त्या मूळच्या रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्यातील धामेली-भोजनेवाडीमधील रहिवासी होत्या. त्यांचे पती अमोल महाडिक हेही एअर इंडिया सेवेत पायलट आहेत. अपर्णा यांची विनम्रता, व्यावसायिक कार्यक्षमतेसाठी ओळख होती. धामेली भोजनेवाडी येथे त्यांचे घर आहे. त्यांचा अमोल महाडिक यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला. त्यांना एक बारा वर्षांची मुलगी आहे. सासू, सासरे, अमोल, अपर्णा आणि मुलगी असे हे पाच जणांचे कुटुंब मुंबईला राहतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या सख्ख्या बहिणीची अपर्णा ही सून आहे. हे कुटुंब दरवर्षी गणपती व शिमगोत्सवाला न चुकता येऊन येथील उत्सवात सहभागी होतात.

- लहानपणीच रोशनीने पाहिले हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न..
दुसरी क्रू मेंबर रोशनी राजेंद्र सोनघरे ही डोंबीवली येथे राहणारी असली तरी तिचे मूळ गांव हे मंडणगड तालुक्यातील बुरी हे आहे. आई राजेश्री, वडील राजेंद्र, भाऊ विघ्नेश असे तिचे कुटुंब आहे. लहानपणापासून हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न तिने बाळगले होते. मुंबईतील सरस्वती इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने भारत कॉलेजमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने अंधेरी संस्थेतून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. 2021मध्ये ती स्पाईस जेटमध्ये ऊजू झाल्यानंतर 2024 मध्ये ती एअर इंडियामध्ये ऊजू झाली होती. सोनघरे कुटुंब मुंबईत वास्तव्यास असले तरी गावाशी त्यांचे नाते आजही घट्ट आहे.

- हलाखीच्या परिस्थितीत मैथिलीने घेतले शिक्षण
तिसरी क्रू मेंबर रायगडची मैथिली पाटील. पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील टी. एस. रहेमान शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मैथिलीने अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले आणि दोन वर्षांपूर्वी ती एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियाच्या सेवेत लागली होती. गुऊवारी मैथिलीची नेमणूक अहमदाबाद ते लंडन विमान क्रमांक ए1-171वर असल्याने ती बुधवारीच मुंबई मार्गे अहमदाबाद असा प्रवास करत कामावर ऊजू झाली होती. गुरुवारी दुपारनंतर विमान दुर्घटनेच्या बातमीनंतर मैथिलीचे कुटुंबीय चिंतेत होते. मैथिलीची कोणतीही माहिती मिळत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी ते अहमदाबादकडे रवाना झाले. आई-वडील, दोन बहिणी आणि भाऊ अशा कुटुंबातील मैथिली ही थोरली मुलगी. मैथिली पाटीलचे वडील पनवेलजवळ असणाऱ्या ओएनजीसी कंपनीमध्ये लेबर वर्कर आहेत.