For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ती सर्व कामे डॉ. निंबाळकरांच्या कार्यकाळातीलच

10:48 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
ती सर्व कामे डॉ  निंबाळकरांच्या कार्यकाळातीलच
Advertisement

कॉंग्रेस श्रेय लाटत नाही : तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंव्हाही सहकार्याची भूमिका

Advertisement

खानापूर : माजी आमदार अंजली निंबाळकर तालुक्याच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहिलेल्या आहेत. तसेच दूरदृष्टी ठेवून तालुक्याच्या विकासासाठी विविध विकास योजना मंजूर करून आणल्या. यात हायटेक बसस्थानक, माता शिशू दवाखाना, हेस्कॉम कार्यालय, पोलीस स्थानक, समाज कल्याण कार्यालय, राणी चन्नम्मा वसती शाळा यासह इतर विकासकामे माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली. आणि ती तातडीने उभारली गेली आहेत. मात्र या विकासकामांचे श्रेय भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि पदाधिकारी घेत आहेत.

मात्र याच भाजपने अनेक विकासकामांत अडथळा आणलेला होता. तालुक्याचे नेतृत्व भाजपकडे आहे. काँग्रेस राज्यात सत्तेवर आहे. तालुका काँग्रेस सूडबुद्धीचे राजकारण न करता खानापूर तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे मंगळवारी खानापूर ब्लॉक काँग्रेसच्यावतीने येथील विश्रामधामात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून बसस्थानक तसेच माता शिशू दवाखाना आणि हेस्कॉमचे कार्यालय मंजूर झाल्याचे काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश जाधव यांनी कागदपत्रानिशी दाखवून दिले.

Advertisement

यात हेस्कॉमच्या इमारतीसाठी 95 लाख मंजूर झाले असून याची निविदा दि. 6 फेब्रुवारी 2021 रोजी मंजूर झाली आहे. त्यानंतर हेस्कॉमच्या इमारतीच्या उभारणीस सुरुवात झाली आहे. तसेच माता शिशू दवाखान्यासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न करून 13 कोटी 9 लाख 94 हजारचा निधी दवाखान्यासाठी मंजूर करून आणला होता. हायटेक बसस्थानक शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतले होते. यात काही तांत्रिक अडथळे आल्याने बसस्थानक उभारणीस थोडा उशीर झाला. देगांव बहुग्राम पाणी योजनेसाठी अंजली निंबाळकर यांनी जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय अभियत्यांशी बैठक केली होती.

या योजनेचा आराखड्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी या योजनेच्या जलस्त्रोतासंदर्भात अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तरे न देण्यात आल्याने ही बहुग्राम पाणी योजनेत अडचणी निर्माण झाल्या. मात्र सरकारने सौंदत्ती येथील रेणुका जलसागरातून पाणी आणून ही बहुग्राम पाणी योजना अंमलात आणली. आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यासह भाजपचे पदाधिकारी सर्व विकासकामे भाजपच्या काळातच झाल्याचे जाहीर करत आहेत. वर्षभरात आमदारांनी तालुक्याच्या विकासासाठी कोणता निधी  मंजूर करून आणला, हे प्रथम जाहीर करावे, लोकांची दिशाभूल करून श्रेय लाटण्याचा खटाटोप करू नये,

काँग्रेसकडून खानापूरच्या विकासासाठी कायमच सहकार्याची भूमिका राहील, असे अॅड ईश्वर घाडी यांनी बोलताना सांगितले. यावेळी यशवंत बिरजे यांनीही श्रेय लाटण्याच्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते महादेव कोळी, रियाज पटेल, महांतेश राऊत, विनायक मुतगेकर, संदीप देसाई, नगरसेवक तोईद चांदकन्नावर, पांडुरंग मिटगार, गुड्डुसाब टेकडी, दीपक कवठणकर, अनिता दंडगल, गीता आंबडगट्टी, सावित्री मादार, सखुबाई पाटील, सूर्यकांत कुलकर्णी, शफी काजी, दत्ता बिडीकर, ईश्वर बोबोटे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.