बस्तोडा हल्ल्यातील सर्वांना अटक होईल
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा इशारा: स्थानिक पती-पत्नीला मारहाण
म्हापसा : बस्तोडा येथे शोरमा दुकान चालविणाऱ्या विवेक शिरोडकर व त्यांच्या पत्नी श्रुती शिरोडकर यांना सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान 10 जणांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली असून मुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. यात कोण गुंतले आहेत त्यांच्यावर कारवाई होईलच. यात कुणी पोलिस असल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आपण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गुंडागिरी करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सोमवारी रात्री बस्तोडा जंक्शनवर 10 जणांच्या जमावाने दंडुके, लोखंडी सळ्या आदी साहित्य वापरुन वरील दोघा जणांना मारहाण केली होती.
याबाबत रितसर तक्रार म्हापसा पोलिसस्थानकात देण्यात आली आहे. या घटनेबाबत 24 तास उलटले तरी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. यात आता राजकीय रंग येऊ लागला आहे. शिरोडकर कुटुंबीयांनी याबाबत मंगळवारी पोलिसस्थानकात भेट देऊन आमच्या कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या संशयितांना त्वरित अटक करा, अशी मागणी केली. दरम्यान पोलिस निरीक्षक निखिल पालेकर हे दीर्घ रजेवर गेले होते. त्यांना त्वरित ड्युटीवर ऊजू व्हावे, असा आदेश अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिला आहे. हे प्रकरण आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हाताळत असून या मारहाणप्रकरणी गुंतलेल्या सर्व संशयितांना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.