For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्फोटातील सर्व जखमींचा मृत्यू

12:03 PM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्फोटातील सर्व जखमींचा मृत्यू
Advertisement

बळींची संख्या 8 वर : सुरक्षेची खबरदारी घेतली नसल्याचे स्पष्ट : व्यवस्थापनाविरोधात संताप

Advertisement

बेळगाव : मरकुंबी, ता. बैलहोंगल येथील इनामदार शुगर्समध्ये बुधवारी दुपारी बॉयलर स्फोटात होरपळून जखमी झालेल्या आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आठवर पोहोचला आहे. गुरुवारी सकाळी चौघा जणांचा तर सायंकाळी शेवटच्या जखमीचाही मृत्यू झाला. या प्रकरणी कारखान्याच्या तिघा व्यवस्थापकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत या घटनेसंबंधीची माहिती दिली आहे.

बुधवार दि. 7 जानेवारी रोजी दुपारी 2.15 वाजता व्हॉल्वची दुरुस्ती सुरू असताना बॉयलरचा स्फोट होऊन आठ कामगार जखमी झाले होते. या सर्वांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. व्हॉल्व दुरुस्ती करताना सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेतली नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असून गुरुवारी खासगी इस्पितळात आठ मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी अक्षय सुभाष चोपडे (वय 48) राहणार चावडी गल्ली, रबकवी, सुदर्शन महादेव बनोशी (वय 25) राहणार चिक्कमुनवळ्ळी, ता. खानापूर, दीपक नागाप्पा मुनवळ्ळी (वय 32) राहणार नेसरगी, ता. बैलहोंगल या तिघा जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

गुरुवारी उपचाराचा उपयोग न होता मंजुनाथ गोपाल तेरदाळ (वय 31) राहणार हुलीकट्टी, ता. अथणी, गुरुपादप्पा बीराप्पा तम्माण्णावर (वय 38) राहणार मरेगुद्दी, ता. जमखंडी, भरतेश बसाप्पा सारवाडी (वय 27) राहणार गोडचिनमलकी, ता. गोकाक, मंजुनाथ मडिवाळप्पा काजगार (वय 28) राहणार अरवळ्ळी, ता. बैलहोंगल या चौघाजणांचा मृत्यू झाला आहे. राघवेंद्र मल्लाप्पा गिरियाळ (वय 36) राहणार गिळीहोसूर, ता. गोकाक याचा सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील सर्व जखमी दगावले आहेत.

कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीच खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे तिघा व्यवस्थापकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक चिदंबर मडिवाळर, मुरगोडचे पोलीस उपनिरीक्षक आय. एम. मठपती व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनीही खासगी इस्पितळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे. यासंबंधी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 125(बी), 289, 106(1) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तिघा व्यवस्थापकांवर एफआयआर

इनामदार शुगर्समधील दुर्घटना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेतली नसल्यामुळे झाली आहे. त्यामुळे जनरल मॅनेजर (टेक्निकल हेड) व्ही. रतीनम, जनरल मॅनेजर (इंजिनियरिंग हेड) प्रवीणकुमार टाकी, डेप्युटी जनरल मॅनेजर (प्रोसेस) एस. विनोदकुमार यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीसप्रमुखांनी दिली. आठ कामगारांचा होरपळून मृत्यू होऊनही कारखान्याचे कोणीच संचालक कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले नाहीत. त्यांच्यावर एफआयआर का दाखल झाला नाही? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता चौकशी सुरू आहे. सध्या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशीअंती पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.