महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकृष्णासह सर्व यादववीर प्रभासला निघाले

06:16 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 

Advertisement

उद्धव बद्रीकाश्रमात गेल्यावर द्वारकेवर अनेक संकटे येऊ लागली. त्यामुळे  चिंतातूर झालेल्या यादवांना काही सांगावे असे कृष्णाच्या मनात आले. त्याच्या लक्षात आले की, ब्राह्मणाच्या शापामुळे होणारा यादवांचा अंत आता जवळ आला आहे. परंतु ह्या सर्वांचा येथे अंत होऊन उपयोगी नाही कारण द्वारका ही सातवी मोक्षपुरी असल्याने पुण्यक्षेत्र आहे. ह्यांचा येथे अंत झाला तर ह्यांना मोक्ष मिळेल परंतु ह्यांची कृत्ये बघितल्यावर ह्यांच्या पापांचे परिमार्जन झाल्याशिवाय ह्यांना मोक्ष मिळणे हे कर्मसिद्धांताच्या विरुद्ध होईल तेव्हा ह्यांना येथून बाहेर काढले पाहिजे. म्हणून तो त्यांना म्हणाला, आपल्या कुळाला ब्राह्मणाचा शाप आहे हे तुम्हाला माहित आहेच. त्या शापानुसार आपले समस्त कुल नष्ट होणार आहे. त्याचीच खुण म्हणून द्वारकेवर नाना विघ्ने येऊन अनेक उत्पात घडत आहेत. त्यामुळे सोन्याची द्वारकानगरी नष्ट होण्याची शक्यता आहे. आता जर आपण येथे राहिलो तर घोर संकटात सापडून दु:खी होऊ. त्यावर उपाय म्हणून येथे क्षणभरसुद्धा न राहता आपण सर्वजण प्रभास क्षेत्री जाऊ. तेथे काही धार्मिक कार्ये करून आपल्याला मिळालेल्या शापाचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करू. श्रीकृष्णाचे सांगणे सगळ्यांना पटले आणि ते प्रभास ह्या क्षेत्री जाण्यास तयार झाले. पुढे श्रीकृष्ण म्हणाला, प्रभास क्षेत्री प्राची आणि सरस्वती ह्या दोन नद्या सागराला मिळाल्या आहेत. आपण सर्वजण तेथे जाऊन विधीयुक्त तीर्थविधान करूयात. वेदात सांगितल्याप्रमाणे शुचिर्भूत होऊन तीर्थस्थान, उपोषण, तीर्थविधान करून शाप नष्ट होण्यासाठी पूजा करूयात. स्नान करून हरिहराला वस्त्रs, अलंकार, चंदनादि पूजासंभार समर्पित करूयात. त्याची षोडशोपचार पूजा करून श्रद्धेने हरीहराची प्रार्थना करूयात. वेदवेदांगपारंगत, शमदमादितपयुक्त, स्वधर्मात मग्न असलेल्या ब्राह्मण समुदायाचे विघ्नशांत्यर्थ पूजन करूयात. अरिष्टनिरसन होऊन शांती मिळण्यासाठी स्वस्तिवाचन करणाऱ्या ब्राह्मणांना आपण श्रद्धायुक्त दान देऊयात. त्यात गोदान, भूदान, गजदान, अश्वदान, सुवर्णदान, तिळदान, वस्त्रदान, गृहदान यांचा श्रद्धेने समावेश करूयात. ज्यामुळे ब्राह्मण अपार सुखी होतील ते ते सर्व करूयात. जेथे ब्राह्मण संतुष्ट होतील तेथे अरिष्ठ टिकू शकत नाही. जेथे हरिचे देवतार्चन तसेच शाळीग्रामशिळेचे पूजन होते आणि साधुसंतांचा सन्मान होतो तेथे अरिष्टाचा नाश होतो. जेथे सदभावाने द्विजपूजन आणि भावभक्तीने गोरक्षण होते तेथे संपूर्ण भूतदया नांदत असते तेथे विघ्नाला कदापि थारा मिळत नाही. जेथे अंध, पंगु, अशक्त लोकांना अन्न मिळून दीन लोक सुखी होतील तेथे कधी विघ्नाची बाधा होत नाही. जेथे अलौकिक भूतदया असते तेथे सर्व अरिष्टांचा नाश होऊन सर्वांना सुख देणारा परममंगल, प्रकाश पसरलेला असतो. हे सर्व सांगून मधुकैटभाचे मर्दन करणाऱ्या मुरारी मधुसूदन परमात्मा श्रीकृष्णाने सर्वांना प्रभासला जाण्याची प्रेरणा दिली. यादवांच्यातील वृद्ध, सज्ञान, पुत्र, मित्र, सुहृद, स्वजन जे होते त्यांनी श्रीकृष्णाचे म्हणणे अत्यंत आदराने स्वीकारले. सकळ समृद्धिसंभारासह स्त्राrवृद्धादी बाळकुमाराना नावेत बसवून त्यांना शंखोद्धारी नेण्याची सूचना श्रीकृष्णाने दिली. बाकी श्रीकृष्णासह सर्व यादववीर रथात बसून किंवा हत्तीवरून चतुरंग सेनेसह प्रभासला निघाले. यादवांनी प्रभासला पोहोचल्यावर श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे स्नान, दान आदि सर्व विधी पार पाडले. नंतर सर्व यादवांनी एकत्रितपणे पारण्याचे विधिवत भोजन केले. त्यानंतर त्यांनी मद्यपानाला सुरवात केली. खरं म्हणजे श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे तीर्थविधान करून अरिष्टनिरसन करण्यासाठी ते सर्वजण प्रभासला गेले होते. तेथे मद्यपान करणे कदापि योग्य नव्हते परंतु सर्व विधी आटोपताच लहनमोठ्या सर्वांनीच मद्य प्यायला सुरवात केली आणि थोड्याच वेळात ते झिंगु लागले.

Advertisement

क्रमश:

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#tarunbharatnews
Next Article