For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतो, तेच सर्व लोक करतात

06:38 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतो  तेच सर्व लोक करतात
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पांचा उपदेश अत्यंत सुसंगत असा आहे. जो बाप्पांचा उपदेश शिरोधार्य मानून निरपेक्षतेनं कर्माना सुरवात करतो त्याच्या लक्षात येतं की, कर्म करायला सुरवात केली की, आनंद मिळायला सुरवात होते. तसेच इतर काय करत आहेत? त्यांनी कर्म करायला सुरवात केली आहे की नाही?  इत्यादि विचार मनात न आणता तो कर्म करायला सुरवात करतो. त्यामुळे त्याचे कर्म वेळेत पूर्ण होते. फळाची अपेक्षा नसल्याने वाट्याला आलेले कर्म त्याच्या हातून कौशल्याने पार पडते. सुखी व समाधानी होण्यासाठी कर्मातून मिळणाऱ्या फळाची गरज नसते. हे सुखसमाधान कशावरही अवलंबून नसल्याने एकदा मिळू लागले की, त्यात वाढच होत राहते ह्याचा तो अनुभव घेत असतो. पुढं बाप्पा सांगतात, तुला फळाची गरज नाही हे लक्षात आलंय ना, मग केलेलं कर्म मला अर्पण कर म्हणजे त्या फळामुळे जे काही पाप पुण्य तयार होईल ते भोगण्यासाठी तुझा पुनर्जन्म होणार नाही. हे जन्ममृत्यूचं चक्र तू भेदलस की, आपोआप मला येऊन मिळशील. बाप्पा पुढील श्लोकात सांगतात की, जन्ममृत्युचं चक्र भेदायचं रहस्य तुला मी सांगितलं. इथुन पुढे निरपेक्ष बुद्धीने आसक्तीरहित कर्म करून लोकसंग्रह कर. लोकांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दे म्हणजे त्यांनाही त्यांचा उध्दार करून घेण्यासाठी प्रेरणा मिळेल.

परमां सिद्धिमापन्ना पुरा राजर्षयो द्विजा ।

Advertisement

संग्रहाय हि लोकानां तादृशं कर्म चारभेत् ।। 20।।

अर्थ-पूर्वी राजर्षि व ब्राह्मण यांनी श्रेष्ठ सिद्धि मोक्ष मिळविला आहे. म्हणून लोकसंग्रहाकरिता तशा प्रकारचे आसक्तिरहित कर्म आरंभावे.

विवरण-बाप्पा सांगतायत, राजा, पूर्वीच्याकाळी राजर्षी आणि ब्राह्मण यांनी असक्तीरहित कर्म करून मोक्ष मिळवला आहे पण मोक्ष मिळवल्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी लोकसंग्रह करायला सुरुवात केली. हे करतानाही त्यांना कोणती अपेक्षा नव्हती पण समाजजागृती होऊन आपल्याप्रमाणेच इतरांचाही उत्कर्ष व्हावा अशी कळकळ त्यामागे होती. लोकसंग्रह म्हणजे नुसताच माणसांचा जमाव जमवणे असे नसून त्यामागे लोकांना एकत्रित करून त्यांना त्यांच्या सुप्त शक्तीची जाणीव करून देणे हे मुख्य उद्दिष्ट असते. स्वत:चं भलं झाल्यावर सर्वांचं भलं व्हावं असा उदात्त हेतू मनात ठेवून हे मोक्षपदी बसलेले ब्रम्हर्षी आणि राजर्षी कार्य करत असतात. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन तुही आसक्तीरहित होऊन लोकसंग्रह कर. बाप्पांच्या या सांगण्यामागे एक विशिष्ट उद्देश आहे ते तो पुढील श्लोकात सांगत आहेत.

श्रेयान्यत्कुरुते कर्म तत्करोत्यखिलो जन ।

मनुते यत्प्रमाणं स तदेवानुसरत्यसौ ।। 21 ।।

अर्थ-श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतो, तेच सर्व लोक करतात. तो जे प्रमाण मानतो त्यालाच ते सर्व लोक अनुसरतात.

विवरण-समाजाला एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीचं अनुकरण करणं फार आवडतं. त्याची वेशभूषा, त्याचे आचारविचार त्याला आदर्श वाटतात. अशावेळी जर चुकीचे आदर्श पुढे आले तर समाजाची घडी विस्कटायला वेळ लागत नाही. म्हणून बाप्पा राजाला राजर्षी आणि ब्रह्मर्शी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाचे नेतृत्व करून लोकसंग्रह करायला सांगतायत. समाज भरकटू नये असा उद्देश त्यामागे आहे. हाच विचार भगवंतांनी गीतेत जे जे आचरती श्रेष्ठ, ते ते ची इतरेजन अशा शब्दात बोलून दाखवला आहे. पुढं बाप्पा म्हणतायत, राजा तुला मी नुसता उपदेश करत नाही तर स्वत:ही तसे आचरण करतो.

विष्टपे मे न साध्योस्ति कश्चिदर्थो नराधिप ।

अनालब्धश्च लब्धव्य कुर्वे कर्म तथाप्यहम् ।। 22।।

हे राजा, जगामध्ये मला काहीही साध्य करावयाचे नाही, काहीही मिळवावयचे नाही तथापि मीही कर्म करत असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.