विद्यापीठातील सर्वच सुवर्णपदकांवर ‘सावित्रीं’चाच ठसा
सावित्रीबाई फुलेंचा वारसा दृश्य स्वरूपात : उच्च शिक्षणात वाढतोय मुलींचा टक्का : सर्वच गोल्ड मेडलवर मुलींची मोहोर
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
प्राथमिकपासून ते उच्च शिक्षणापर्यंत महिलांचे प्रमाण 60 टक्केपेक्षा जास्त वाढले आहे. दहावी-बारावीला अव्वल येण्यापासून ते पदवी, पदव्युत्तर शिक्षणात विद्यापीठाचे राष्ट्रपती व कुलपती सुवर्णपदकही गेल्या 10 वर्षात मुलींनीच पटकावले आहे. याचाच अर्थ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाची नुसती दारेच उघडी केली नाहीत, तर शिक्षण घेण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यात निर्माण केला. त्यातूनच बहुजनांच्या मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढले आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची बुधवारी, जयंती या पार्श्वभूमीवर क्रांतिज्योतीच्या कार्याचा वारसा दृश्य स्वरूपात सावित्रीच्या लेकींनी जपला आहे.
उच्च शिक्षणात सर्वच अभ्यासक्रमाचे शिक्षणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. नुसतेच शिक्षण न घेता त्या त्या क्षेत्रात त्या नैपुण्य मिळवत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील संशोधनात प्रमाण कमी असले तरी तेथेही हळूहळू टक्का वाढत आहे. चांद्रयान तीन चे चंद्रावरील लँडींग यशस्वी करण्यात महिलांचाही सहभाग असल्याचे जगाने पाहिले. त्यामुळे अवकाश संशोधनातही मुली आपला ठसा उमटवत आहेत. शिवाजी विद्यापीठातील एनआयआरच्या जागतिक क्रमवारीतही विद्यापीठातील महिला संशोधकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. विद्यापीठात शिक्षण घेऊन परदेशातशिक्षण व संशोधन करण्यासह करिअर करणाऱ्या मुलींची संख्याही वाढत आहे. स्पर्धा परीक्षांत देशासह राज्यात अव्वल येत त्यांनी वेगळी झलक दाखवली आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये मुलांच्या बरोबरीने मुलीची संख्या निदर्शनास आली आहे.
मुलींचे शिक्षण मोफत आहे, तोपर्यंत पालक निश्चिंत राहतात. परंतु त्यांच्या उच्च शिक्षणावेळी काही पालकांमध्ये उदासिनता दिसून येते. परंतु ही संख्या कमी आहे. काही मुली मात्र जिद्दीवर पार्टटाईम काम करून शिक्षणाचा खर्च करत आहेत. पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायिक शिक्षणही त्या घेत आहेत.
मुलींना परिस्थितीची जाणीव असते. मध्यमवर्गीय समाजातील मुलींना भविष्याची चिंता, परिस्थितीची जाणीव असते. त्यामुळे कष्टाची तयारी त्यांच्यात असते. कारण त्या स्वत:चा नाही तर संपुर्ण कुटुंबाचा विचार करतात, कष्ट करतात. म्हणूनच सर्वच सुवर्णपदकांवर मुलीच प्राधान्याने दिसत आहेत.
डॉ. सुजय पाटील (कमला कॉलेज)
विद्यापीठाकडून सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा वारसा व वसा नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचे कार्य होत आहे. शारदाबाई पवार अध्यासनातून दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानमाला घेतली जाते. यंदा ही व्याख्यानमाला कराड येथील वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये होणार आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तक डॉ. भारती पाटील यांनी लिहून प्रकाशित केले आहे. ‘स्त्री-पुरूष समतेच्या खडतर प्रवासातील क्रांतीशलाका सावित्रीबाई फुले’ यावर डॉ. पाटील यांनी लेखन आहे.
मुलींनी विवेकाचा वापर केला पाहिजे
मुलींचे शिक्षणात सावित्रीबाई फुलेंनी मुलींना विवेकवादी विचार करायला सांगितले आहे. शिक्षणाबरोबर मुलींनी विवेकाचा वापर केला पाहिजे.
डॉ. भारती पाटील (शारदाबाई अध्यासन केंद्र, शिवाजी विद्यापीठ)
पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी
वर्ष मुले मुली
2019 23992 26407
2020 33165 33211
2021 25943 26357
2022 57961 26910
2023 21963 27475