For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व मसाला उत्पादन प्रकल्पांचे होणार निरीक्षण

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व मसाला उत्पादन प्रकल्पांचे होणार निरीक्षण
Advertisement

शासकीय यंत्रणेने दिला आदेश : अनेक देशांमधील कारवाईनंतर उचलले पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यात घातक पदार्थ मिळाल्याचा आरोप करत सिंगापूर आणि हाँगकाँग प्रशासनाने या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनांवर बंदी घातली होती. तसेच मसाल्यांची खेप भारतात परत पाठविली होती. यानंतर भारतीय यंत्रणांनी सक्रीयता दाखविली आहे. आता केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी रेग्युलेटर एफएसएसएआयने स्पाइस मिक्स तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये राष्ट्रव्यापी निरीक्षणाचा आदेश दिला आहे. एफएसएसएआयच्या आदेशामुळे सरकार भारतातून होणाऱ्या 5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याच्या मसाल्यांच्या निर्यातीला वाचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे.हाँगकाँगने मागील महिन्यात एमडीएचकडून निर्मित तीन स्पाइस ब्लेंड आणि एव्हरेस्टकडून निर्मित फिश करी मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली होती. सिंगापूरने एथिलिन ऑक्साइडच्या उच्चपातळीचे कारण देत एव्हरेस्ट स्पाइस मिक्स परत पाठविण्याचा आदेश दिला होता. हा मसाला मानवी वापरासाठी उपयुक्त नसुन दीर्घकाळापर्यंत याच्या वापरामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचे सिंगापूर सरकारचे सांगणे होते.

Advertisement

उत्पादने लोकप्रिय

संबंधित कंपन्यांचे मसाले भारतात अत्यंत लोकप्रिय आहेत. भारतीय उपखंडात यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. तसेच युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतही याला मोठा ग्राहकवर्ग आहे. आमचे सर्व मसाले सुरक्षित असल्याचे या कंपन्यांचे सांगणे आहे. तरीही अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या नियामकाने या मसाल्यांसंबंधी अधिक माहिती मिळविली जात असल्याचे सांगितले आहे. भारत सरकारने यापूर्वीच दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनांच्या परीक्षणाचा आदेश दिला होता.

व्यापक निरीक्षण

भारतीय खाद्य नियामक एफएसएसएआयने आता अधिकाऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि विदेशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविल्या जाणाऱ्या करी पावडर आणि ब्लेंड मसाला मिक्स निर्मितीवर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. याचबरोबर पावडर मसाल्यांसाठी ‘सर्व उत्पादन प्रकल्पांमध्ये व्यापक निरीक्षण, नमुने मिळविणे आणि परीक्षण’ करण्याचा आदेश दिला आहे. नमुन्यादाखल जमा करण्यात आलेल्या प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षा मापदंडांचे पालन करण्यासाठी विश्लेषण केले जाणार आहे. एथिलिन ऑक्साइडच्या प्रमाणाचेही परीक्षण केले जाईल. या रसायनाचा वापर भारतातही वर्ज्य आहे. परीक्षणाच्या निष्कर्षात अनियमितता आढळून आल्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.

भारत सर्वात मोठा उत्पादक

भारत मसाल्यांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे तसेच याचा सर्वात मोठा निर्यातदार देखील आहे. 2022 मध्ये या मसाल्यांच्या पदार्थांची देशांतर्गत उलाढाल 10.44 अब्ज डॉलर्स इतकी राहिल्याचा अनुमान आहे.

Advertisement
Tags :

.