कसोटी मालिकेतून अष्टपैलू ग्रीन बाहेर
वृत्तसंस्था / सिडनी
नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर चषकासाठी कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळविली जाणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलु कॅमेरुन ग्रीनला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागत आहे. 25 वर्षीय ग्रीनच्या मणक्यात स्ट्रेस फॅक्चर असल्याने त्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये ग्रीनला यादुखापतीमुळे वारंवार वेदना जाणवल्या होत्या. 2019 पासून त्याला या दुखापतीचा सातत्याने त्रास होत आहे. ग्रीनवर लवकरच तज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. यापूर्वी वेगवान गोलंदाज बुमराह, जेम्स पॅटीनसन, बेरेनडॉर्फ, ड्वेरहुईस यांनाही अशाच तऱ्हेच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. आता कॅमेरुन ग्रीनवरही डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला पर्थ येथे सुरुवात होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर ग्रीनला किमान 6 महिने विश्रांती घ्यावी लागेल. दरम्यान 2025 च्या क्रिकेट हंगामातही त्याला अनेक स्पर्धांना मुकावे लागणार आहे. न्यूझीलंडमधील प्रख्यात सर्जन ग्रॅहॅम इंग्लीस आणि ग्रोवेन स्कुटेन हे कॅमेरुन ग्रीनवर शस्त्रक्रिया करणार आहेत. डेव्हीड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये ग्रीनचा समावेश करण्यात आला होता. आता या आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन निवड समितीला सलामीच्या नव्या फलंदाजाचा शोध घ्यावा लागेल.