For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश दूध संकलन केंद्रातील सर्व उत्पादन उत्कृष्ट दर्जाचे

11:07 AM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
गणेश दूध संकलन केंद्रातील सर्व उत्पादन उत्कृष्ट दर्जाचे
Advertisement

वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव : संचालक उमेश उर्फ प्रवीण देसाई यांच्या कार्याचे कौतुक

Advertisement

वार्ताहर/उचगाव

गणेश दूध संकलन केंद्रातील सर्व प्रॉडक्ट्स नैसर्गिकरित्या चवदार असल्याने या प्रोडक्ट्सना ग्राहकांची अधिक पसंती आहे. चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे सर्व प्रॉडक्ट्स बनविले जातात. यामागे त्यांचा प्रामाणिकपणा, कष्ट आणि जिद्दही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या भागातील एक मराठी युवक उत्कृष्ट उद्योजक बनत असल्याने याचा खरोखरच आम्हा तमाम मराठी जनतेला अभिमान आहे, असे भावोद्गार काडाचे जिल्हाध्यक्ष युवराज कदम यांनी व्यक्त केले. उचगावजवळील बेळगुंदी फाट्यानजीक असलेल्या गणेश दूध संकलन केंद्र व गणेश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट यांनी यशस्वीपणे अकरा वर्षे पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण करीत असल्याने अकरावा वर्धापन दिन मोठ्या थाटात रविवारी दुपारी बारा वाजता गणेश दूध संकलन केंद्राच्या सभागृहात पार पडला.

Advertisement

या कार्यक्रमात प्रमुख वत्ते म्हणून युवराज कदम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम सेना हिंदुस्तान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून लँड ट्रिब्युनलचे संचालक बाळासाहेब देसाई, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव पावशे, हिंडलगा ग्रा. पं.माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, सदस्य डी. बी. पाटील, मधु बेळगावकर, मळेकरणी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले, श्रीराम सेना हिंदुस्तान उचगाव विभाग प्रमुख प्रफुल्ल चौगुले, उचगाव ग्रा.पं. माजी अध्यक्ष संभाजी कदम, रुक्मिणी मोतीराम देसाई तसेच मोतीराम देसाई उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत व सत्कार या संस्थेचे मालक उमेश उर्फ प्रवीण मोतीराम देसाई यांनी केले. यानंतर युवराज कदम यांच्या हस्ते गणेशमूर्तीचे पूजन तर रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रामचंद्र मन्नोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मराठी माणूस छोटे-मोठे व्यवसाय करायला धसतो. पण आज गणेश दूध संघाचे उमेश उर्फ प्रवीण देसाई यांनी केलेली प्रगती आणि त्यांचे धाडस हे कौतुकास्पद आहे. त्यांचे अनुकरण या भागातील युवकांनी करून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी गाई म्हशींची पैदास वाढवावी आणि दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत करावा, असा मौलिक सल्ला रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

तर बाळासाहेब देसाई म्हणाले की, हा अकरावा वर्धापन दिन नाहीतर 51 वा वर्धापन दिन आहे. कारण मोतीराम देसाई यांनी गेल्या पन्नास वर्षात दुग्ध व्यवसाय करत आतापर्यंत त्यांनी या व्यवसायात प्रगती करत हा दूध केंद्राचा पसारा वाढवला आहे. आणि त्याचेच हे आज फलित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी गणेश दूध संकलन केंद्राने अल्पावधीत केलेल्या घौडदौड आणि गेल्या अकरा वर्षात सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात कसे सहकार्य आणि मदत केल्याचे अनेक उदाहरणे देऊन सांगितले. वर्धापन दिनानिमित्त बेळगाव तालुक्यातील अनेक दूध संस्थांच्या संचालक मंडळांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तालुक्यातील अनेक गावातील दूध संघांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन प्रवीण देसाई यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर व आभार संस्थेचे मॅनेजर सुधाकर करटे यांनी मानले.

Advertisement
Tags :

.