डीसीसी बँक निवडणुकीसाठी सर्व सज्जता
निवडणूक अधिकारी श्रवण नायक : बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये उद्या मतदान-मतमोजणी
बेळगाव : आगामी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची (बीडीसीसी) निवडणूक रविवार दि. 19 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील 7 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत असून 14 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 676 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 यादरम्यान मतदान होणार आहे. सायंकाळी 4.15 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रवण नायक यांनी दिली. डीसीसी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निपाणी, रामदुर्ग, रायबाग, हुक्केरी, अथणी, बैलहोंगल व कित्तूर मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे. मतदारांना बॅलेट पेपरद्वारे मतदान करता येणार आहे. यासाठी 7 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून मतदान केंद्रांवर सीसीटीव्हींची नजर असणार आहे. मतदारांनी गुप्त मतदानाला सहकार्य करावे. आपण दिलेले मत कोणालाही दाखविता येणार नसून मतदारांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त
शहरातील कँम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान केंद्रावर उमेदवार, पोलिंग एजंट व मतदारांवर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पेन व पेंन्सिल घेऊन येण्यावरही बंद असणार आहे. मतदार केंद्रावर सर्व सज्जता करण्यात आली आहे. केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मेडिकल व्यवस्था करण्यात येणार असून आपत्कालीन स्थितीसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अग्निशामक दलही केंद्राचीही नियुक्ती करण्यात येणार असून शौचालय व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
पास असलेल्यांनाच प्रवेशास मुभा
निवडणुकीसाठी एकूण 40 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्र अधिकारी 7, मतदान अधिकारी 21, राखीव अधिकारी 4 व ओळखपत्र वितरण अधिकारी 8 आदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर उमेदवार, पोलिंग एजंट, अधिकारी व पत्रकारांना वगळता सर्वांवर बंदी असणार आहे. निवडणुकीसाठी संबंधितांना पास देण्यात येणार असून पास असलेल्यांनाच प्रवेशास मुभा असणार असणार आहे. उमेदवार व पत्रकारांसाठी विशेष कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
एकूण 676 मतदार
रविवारी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण 676 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निपाणी 119, रामदुर्ग 35, रायबाग 205, हुक्केरी 90, अथणी 125, बैलहोंगल 73 तर कित्तूर मतदारसंघातून 29 मतदार मतदान करणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेंपर्यंत निवडणूक होणार असून मतदारांना बॅलेट पेपरद्वारे मतदान करता येणार आहे. मतदान झाल्यानंतर लागलीच दुपारी 4.15 वाजता मतमोजमीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नायक यांनी केले. यावेळी सहकार खात्याचे उपनिबंधक रविंद्र पाटील, डीसीसी बँकेचे सीईओ एन. जी. कलावंत आदी उपस्थित होते.
निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार
निवडणुकीत निपाणी आण्णासाहेब जोल्ले-उत्तम पाटील, मल्लप्पा यादवाड-श्रीकांत ढवण, आप्पासाहेब कुलगुडे-बसगौड आसंगी, रमेश कत्ती-राजेंद्र पाटील, महेश कुमठळ्ळी-लक्ष्मण सवदी, बैलहोंगल महांतेश दोड्डगौडर-विश्वनाथ पाटील तर कित्तूर मतदारसंघातून नानासाहेब पाटील-विक्रम इनामदार निवडणूक लढवत असून त्यांचे भवितव्य 19 रोजी समजणार आहे.