योग्याला समोर दिसणारी सगळी माणसे ब्रह्मस्वरूप दिसत असतात
अध्याय सहावा
भगवंत म्हणाले, मी म्हणजे हा देह ही कल्पना मनुष्य घट्ट पकडून बसलेला असल्याने तो देहाभिमान वाढवत नेतो आणि आपला आपणच शत्रू होतो. त्याउलट आपण म्हणजे हा देह नव्हे हे ज्याचा लक्षात आलेले असते तो सद्गुरुंच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत करत आत्मज्ञानी होतो.
शीत, उष्ण, सुख, दु:ख, मान, अपमान अशा कोणत्याही परिस्थितीत तो शांत निश्चल असतो. पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभ कर्मे ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे, त्यास त्याचे सुख, दु:ख जाणवत नाही. ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांचे ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे, अशा गुणी व्यक्तीला योगी म्हणतात, ह्या अर्थाचा
तोषला ज्ञान-विज्ञाने स्थिर जिंकूनि इंद्रिये । तो योगी सम जो देखे सोने पाषाण मृत्तिका ।। 8 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार योग्याचा आत्मा त्रिगुणातून मुक्त झालेला असतो त्यामुळे त्याला सर्वत्र ब्रह्मच दिसत असते. त्याला समोरच्या वस्तू दिसत असतात पण त्या ब्रह्मरूप आहेत ह्याची जाणीव त्याला होत असते. सर्व विश्व ब्रह्मव्याप्त आहे हे जाणून घेणे हे ज्ञान होय आणि समोर दिसणारा ईश्वराने मांडलेला त्याच्या प्रपंचाचा पसारा हे विज्ञान होय.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सुखदु:ख, मानापमान ह्या माणसाच्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या भावना योग्याच्या मनाला स्पर्श करत नसल्याने त्या उत्पन्न करणारे दृश्य जगत त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरते व मग आपणच ज्ञानरूप आहोत असे त्याच्या लक्षात येते. आपण म्हणजेच ज्ञान आणि त्या ज्ञानाने सर्व व्यापलेले आहे हे जाणल्यावर विचार करणे सहजच थांबते. तो देहात जरी दिसत असला तरी निरिच्छ असल्याने त्याने इंद्रिये जिंकलेली असतात. त्यामुळे तो योगयुक्त होऊन ईश्वराशी, परब्रह्माशी जोडला गेल्याने परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. त्याला सगळ्या वस्तू परब्रह्मस्वरूप दिसत असल्याने शुद्ध सोन्याचा मेरुपर्वताएवढा ढीग, मातीचे ढेकूळ ह्यात त्याला कोणताही फरक वाटत नाही. पृथ्वीच्या किमतीचे म्हणजे अत्यंत महागडे शुद्ध अमूल्य रत्न आणि दगड त्याला सारखेच वाटतात. ज्या वस्तूची इच्छा होत नाही ती वस्तू कितीही अमूल्य असली तरी आपले तिच्याकडे दुर्लक्षच होते. योग्याला तर कसलीच इच्छा नसल्याने त्याला कशातच गम्य नसते. योग्याला समोर दिसणाऱ्या वस्तूंची काहीच अपूर्वाई नसते. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, त्याला समोरची सगळी माणसे ब्रह्मस्वरूप दिसतात. त्यामुळे हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, दोन्ही पक्षांचे हित इच्छिणारे मध्यस्थ, प्रिय, अप्रिय, नातलग, सज्जन, पापी, या सर्वांच्याकडे समबुद्धीने पाहणारा योगी सर्वांत श्रेष्ठ ठरतो.
शत्रू मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा। असो साधु असो पापी सम पाहे विशेष तो।।9।।
समजा निरनिराळ्या प्रकारचे गहू एकत्र करून एखाद्याला दाखवले तर तो म्हणेल अरे हे तर गहू आहेत. त्यावेळी त्याला त्यातले एव्हढे गहू एका प्रकारचे आहेत इतर अन्य प्रकारचे आहेत हे लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे योग्याला समोरची सगळी माणसे ब्रह्मस्वरूप दिसत असल्याने तो त्यांच्यात फरक करू शकत नाही.
क्रमश: