शेतकरी संघात सर्वपक्षीय संचालकांचा सावळा गोंधळ
कोल्हापूर / धीरज बरगे :
शेतकरी संघाची सद्यस्थितीतील आर्थिक परिस्थिती पाहता येथे सर्वपक्षीय संचालकांचा सावळा गोंधळ सुरु आहे. संचालक मंडळातच एकमत नसल्याने संघाच्या हितासाठीचे धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. याचा परिणाम संघाच्या आर्थिक उलाढालीवर होत असून उत्पन्नात घट होत आहे. संचालकांचा सद्यस्थितीतील कारभार पाहता प्रशासक काळात उभा राहत असलेला संघाचा बैल पुन्हा बसला असल्याची वस्तुस्थिती आहे. संचालकांकडून सुरु असलेल्या मनमानी कारभाराकडे सर्वपक्षीय नेत्यांचेही साफ दुर्लक्ष झाले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास संघ पूर्णत: मोडकळीस येणार असल्याची भीती सभासद, कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राला आशिया खंडात ओळख निर्माण करुन देण्यामध्ये शेतकरी सहकारी संघाचे मोठे योगदान आहे. संपूर्ण आशिया खंडात नावाजलेला हा संघ सद्यस्थितीत मोठ्या आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे. तोट्यातील संघाला पुन्हा आर्थिक उभारी देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले. पण यानंतर लागलेल्या संघाच्या निवडणुकीत संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. पण काही कारणास्तव निवडणूक बिनविरोध झाली नाही. निवडणुकी दरम्यान नेत्यांनी संचालक मंडळाच्या कारभारावर लक्ष देणार असल्याचे सांगत संघ पुन्हा पूर्वीप्रमाणे उभा करण्याचे आश्वासन दिले. नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास दाखवत सभासदांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या पॅनेलला एकहाती सत्ता दिली. मात्र निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार संचालकांकडून संघामध्ये कारभार होत नसल्याचे सध्याच्या संघाच्या आर्थिक परिस्थितीवरुन दिसून येत आहे..
शेतकरी संघासाठी जानेवारी 2024 मध्ये निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये सर्व 19 जागांवर सर्वपक्षीय पॅनेलने विजय मिळविला. सर्वपक्षीय संचालक संघाला पुन्हा उभारी देतील असा विश्वास सभासदांमध्ये होता. पण वर्षभरातच संचालकांकडून सुरु असलेला कारभार, एकमत नसल्याचेही समोर आले आहे. गेली सहा महिने संघाचे कार्यकारी संचालक पद पण रिक्त आहे. संचालकांमध्ये एकमत होत नसल्याने हे पद रिक्त राहिले आहे. याबाबत दोन वेळा संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली. पण ही बैठक तहकूब करत लांबणीवर टाकण्यात आली. संघाचे अध्यक्ष संघामध्ये आठवड्यातून, महिन्यातून फेरी मारत असल्याची चर्चा आहे. संचालकांमध्ये एकमत नसल्याने कामकाजात विस्कळीतपणा असून धोरणात्मक निर्णय होत नसल्याने संघाचे आर्थिक नुकसान होत आहे.
अनुभवी संचालक मलईमध्ये व्यस्त
संघामधील अनुभवी संचालक केवळ संघातून कोठून मलई मिळेल हे पाहण्यातच धन्यता मानत आहेत. तर संघाच्या कामकाजाचा अनुभव नसणाऱ्या संचालकांना अजून संघच समजलेला नाही. त्यामुळे काही मोजक्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन काही संचालक संघामधून केवळ स्वहित पाहण्यात व्यस्त असल्याने संघाची आर्थिक स्थिती बिकट बनत चालली आहे.
कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावणे गरजेचे
संचालक मंडळात असलेल्या विस्कळीतपणाचा फायदा संघाचे कर्मचारी घेऊ लागले आहेत. भवानी मंडप येथील मुख्य कार्यलयात सुमारे 70 कर्मचारी आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी कार्यालयामध्ये नसल्याचे दिसून येत आहे. वसुलीची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणाचही अंकुश नाही. तर काही कर्मचारी संचालकांशी लागेबंध करत स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे संचालकांसोबतच येथील बेशिस्त कर्मचाऱ्यांमुळेही संघ अडचणीत येत असल्याची चर्चा येथे प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.
पगार वेळेवर नाही, सेवानिवृत्तांची देणी थकली
संघाची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे बाकी आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष आहे. याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होत आहे.
सर्वपक्षीय नेत्यांनी जबाबदारी घेणे आवश्यक
शेतकरी संघाच्या निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय नेते संघाला पुन्हा उभारी देण्यासाठी एकत्र आले. सभासदांनी त्यांच्यावर विश्वास टाकत सत्ता दिली. ते संघासाठी काही तरी करतील अशी अपेक्षा होती. पण सध्याच्या संचालक मंडळाकडून सुरू असलेला कारभार पाहता संघ पुन्हा उभारी घेईल असे वाटत नाही. त्यामुळे निवडणुकीदरम्यान शेतकरी संघाची जबाबदारी घेतलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी संघाच्या कारभारामध्ये लक्ष घालून कोल्हापूरच्या सहकाराला ओळख निर्माण करून देणाऱ्या शेतकरी संघाला पुन्हा उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न करावेत.
सुरेश देसाई, माजी संचालक शेतकरी संघ.