सहकारी संस्थांत सर्वपक्षीय, मनपा-जि.प.मध्ये महायुती
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) तूर्त सत्तांतर होण्याचा प्रश्नच नाही. पाच वर्ष त्यामध्ये बदल होणार नाही. येऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती म्हणून ताकदीने लढू तर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सद्यस्थितीप्रमाणेच सर्वपक्षीय नेत्dयांना घेवून संस्था चालवू अशी स्पष्टोक्ती आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आमदार मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गोकुळमध्ये सत्तांतर होणार काय? महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सहकारी संस्थांप्रमाणेच नेत्यांचा समझोता एक्सप्रेस धावणार काय? या प्रश्नावर उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ चांगल्याप्रकारे सुरु आहे.
पाच वर्ष येथील सत्ताकारणात कोणताही बदल होणार नाही. तसेच जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांच्या राजकारणात सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेतले जाईल. जिल्हा बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, जनसुराज्य, शिवसेना या सर्व पक्षातील नेते एकत्र आहेत. तोच फॉर्म्यूला इतर सहकारी संस्थांतही कायम राहिल. सहकारी संस्था टिकाव्यात यासाठी सर्वांना सोबत घेवून जाण्याचे धोरण असेल. राज्यस्तरावरील नेत्यांनी कोल्हापुरातील सहकारातील या सर्वपक्षीय राजकारणात लक्ष देवू नये हे आम्ही समजावून सांगू.
मुश्रीफ म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकात मार्च 2025 पर्यंत होतील. तसेच त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल. राज्यातील सत्ता सुत्राप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट हे कदाचित स्वतंत्र लढतील मात्र सत्तास्थापनेवेळी महायुती म्हणून सर्व घटक एकत्र येतील. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय स्तरावरील राजकारण असेल. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकारण वेगळे ठेवले जाईल,असे आमदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
मनपाची निवडणुक मार्च महिन्यात
मुश्रीफ म्हणाले, फेब्रुवारी 2025 दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल. मार्च अखेर या निवडणुका संपतील. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती मोठ विजय संपादन करेल.