For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संघटनात्मक बांधणी हेच पक्षांचे ‘लक्ष्य’! युवकांना पक्षासोबत कनेक्ट करण्याचा प्रमुख अजेंडा

06:27 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
संघटनात्मक बांधणी हेच पक्षांचे ‘लक्ष्य’  युवकांना पक्षासोबत कनेक्ट करण्याचा प्रमुख अजेंडा
All parties
Advertisement

कृष्णात चौगले कोल्हापूर

आगामी निवडणुकांमध्ये यश संपादण्यासाठी सर्वच पक्षांनी संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बुथ बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरु असून सर्वसामान्यांना पक्षाशी जोडले जात आहे. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांकडून सरकारने केलेल्या विकासकामांचा, योजनांचा लेखाजोखा मांडला जात आहे. विरोधी महाविकास आघाडीकडून पक्षाची ध्येयधोरणे जनतेंपर्यंत पोहोचवताना गेल्या दोन वर्षातील सत्ताधाऱ्यांच्या उणिवा व दोष मांडत आहेत. ‘गाव तेथे बुथ’ आणि ‘घर तिथे कार्यकर्ता’ संकल्पना सर्वच पक्षांकडून जोरदारपणे राबवली जात आहे.

Advertisement

मतदारयादीतील चित्र पाहता युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या युवा शक्तीचा कल निवडणुकीत ज्या पक्षाच्या, उमेदवाराच्या बाजूने असणार त्या बाजूचा विजय निश्चित होणार आहे. परिणामी आगामी निवडणुकांमध्ये युवा मतदार किंगमेकर ठरणार असून राजकारण्यांनीही त्यांना टार्गेट केले आहे. इच्छुक उमेदवार व नेत्यांनी आपल्या पाठीशी युवकांची फळी उभारण्यासाठी सुरुवातीपासूनच जोरदार प्रयत्न केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक प्रचार यंत्रणेसाठी युवक आवश्यक असल्यामुळे त्यांचे स्थान अतिशय महत्वाचे बनले आहे. दरम्यान महिला मतदारांचे प्रमाण देखील पुरुष मतदारांच्या तुलनेत अपवाद वगळता बरोबरीतच आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये महिला कार्यकर्त्यांनाही अनन्य साधारण महत्व दिले जात आहे.

ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा मेळ घालून पक्षाचे काम सर्व समाजघटकांपर्यंत पोहोवण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आणि जिह्यापासून राज्यपातळीपर्यंत सक्षम नेतृत्व मिळावे, यासाठी युवकांना संधी दिली जात आहे. युवकांच्या हातामध्ये नेतृत्व दिले तरच पक्षाचे विचार शेवटच्या समाजघटकापर्यंत पोहोचतील, याची जाणीव असल्यामुळे बुथ बांधणीची जबाबदारी युवकांवर सोपवली आहे. जनतेला राजकारणाशी काहीही देणेघेणे नसते. उदरनिर्वाह कसा चालवता येईल, याची त्यांना भ्रांत असते. अशा जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांची सोडवणूक कशी करता येईल, याची जबाबदारी युवकांवर दिली आहे. थेट जनतेशी नाळ जोडून त्यांच्यापर्यंत पक्षाचे विचार, ध्येय धोरणे पोहोचवली तरच सत्तेची फळे चाखायला मिळतील, याची राजकारण्यांना जाणीव आहे. त्यामुळे बुथ बांधणीतून सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षाची भूमिका कशी योग्य आहे, आणि विरोधकांची धोरणे कशी समाजहितविरोधी आहेत, हे पटवून दिले जात आहे.

Advertisement

सर्वच पक्षांकडून संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष
पक्षाचा एखादा कार्यक्रम असला की कार्यालयामध्ये येणारे पाच-पन्नास कार्यकर्ते म्हणजे पक्ष नव्हे. तर जिह्यातील प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक वॉर्डात आणि घराघरात आपला कार्यकर्ता असावा, यासाठी सर्वच पक्षांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट हे सहा पक्ष सध्या आघाडीवर आहेत. बुथ बांधणीमध्ये युवक, युवती, महिला, मागासवर्गीय, विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, अशा सर्वच समाजघटकांतील सदस्यांचा समावेश करून सर्वसमावेशक बुथबांधणीवर विशेष भर दिला जात आहे.

महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या तिन्ही पक्षांतील बुथमधील सदस्यांकडून पक्षाने केलेली विकासकामे, राबवलेली धोरणे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहेत. हे करताना विरोधी पक्षाने कोणत्या चुका केल्या, आदींचा उहापोह केला जात आहे.

गत निवडणुकांतील पराभवाची कारणमिमांसा
गत विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांतील अनेक उमेदवारांचा काठावरचा पराभव झाला. त्यामुळे त्याची कारणमिमांसा करून आगामी निवडणुकीत विजय संपादण्यासाठी काय केले पाहिजे, याचा काही पक्षांकडून सध्या गोपनीय पातळीवर सर्व्हे सुरु आहे. ही जबाबदारी युवा पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. यामध्ये प्रत्येक समाजघटकांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षाकडून आणखी काय करायला हवे? गतपंचवार्षिक निवडणुकीत उमेदवाराचा पराभव का झाला? संभाव्य उमेदवार मेरीटमध्ये येण्यासाठी आणखी काय करायला हवे? याबाबत विचारणा केली जात आहे. हा सर्व्हे संबधित पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे पाठवला जाणार असून त्यानंतर संबंधित मतदारसंघात काय केले पाहिजे, याची व्यूव्हरचना केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.