For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व भाषांचा सन्मान झालाच पाहिजे

06:58 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्व भाषांचा सन्मान झालाच पाहिजे
Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

Advertisement

 देवदास मुळे, संजय नलवडे/स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा

येथील श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज नगरीत 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीता राजे पवार, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, संमेलनाच्या उद्घाटक साहित्यिका, विचारवंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या डॉ. मृदुला गर्ग, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मसाप शाहूपुरी शाखा साताऱ्याचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. शरद बेबले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

Advertisement

संविधान अबाधितच राहणार

सातारा केवळ भौगोलिक प्रदेश नसून संगमांचा प्रदेश आहे. ऐतिहासिक काळापासून साताऱ्याचा साहित्य संमेलनाशी संबंध आहे. सातारा जिह्याने 17 संमेलन अध्यक्ष दिले असून साताऱ्यात आतापर्यंत सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. पन्नास वर्षांपूर्वी आणीबाणीत साताऱ्यात झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी आणीबाणीची निंदा करणारा ठराव मांडला होता. साहित्याला नियमबद्ध करणे हास्यास्पदच नाही तर धोकादायक आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. जोपर्यंत विचारांची अभिव्यक्ती, विचार स्वातंत्र्य, साहित्य, परस्परविरोधी विचार यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण जोपर्यंत अबाधित ठेवू तोपर्यंत संविधान धोक्यात आहे, असे कुणीही म्हटले तरी संविधान अबाधित राहणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रामध्ये राजकारण आणू नये

मराठी भाषेला वारकरी आणि संतांनी समृद्ध केले आहे. संत मराठी भाषा ही जोडणारी असून संत साहित्याने मराठी जनांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. मराठी भाषा ही भक्तीचीच नव्हे तर मानवी मूल्यांची भाषा आहे. मराठीचा अभिमान छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला.  त्यावेळी मराठीवरील आक्रमण दूर करण्यासाठी राजव्यवहार कोश अस्तित्वात आणला. त्यानंतर अनेक सारस्वतांनी मराठीला फुलवले आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत मराठी भाषेचा हा अभिमान कायम राहिल. समाजाला दिशा देण्यासाठी साहित्याची निर्मिती होत असते. त्यामुळे कधी टीका झाली तरी वाईट वाटून घेणारातले आम्ही नाही. प्रत्येक साहित्य संमेलन हे दिशादर्शक असते. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत साहित्य संस्थांमध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही. साहित्यिकांनी राजकारणात यावे, मात्र साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदी सक्ती मागे घ्या

राजकारणी व साहित्यिक यांनी आपापल्या सीमारेषा ओळखाव्यात. यामध्ये जर हस्तक्षेप झाला तर साहित्यिकांना आपला कणखरपणा दाखवावा लागेल. इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांची सक्ती होत असून त्याला साहित्यिकांचा विरोध आहे. माय मराठीची अवहेलना सुरू असताना मावशीचे कोडकौतुक सहन केले जाणार नाही. हिंदी सक्ती आपल्याला मागे घ्यावी लागेल. प्रादेशिक भाषा शिकण्याला विरोध नाही तर ती सक्तीने शिकवण्याला आमचा विरोध आहे. हिंदी व अन्य भाषांची सक्ती आपण तात्काळ रद्द करावी आणि त्याचे श्रेयसुद्धा आपण घ्यावे, अशी विनंती जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

भाषा मराठी, हीच आमच्या ललाटी : विश्वास पाटील

संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी सातारा प्रांत म्हणजे खऱ्या अर्थाने साहित्यरत्नांच्या खाणी आहेत, असे सांगत जिल्ह्याचा इतिहास, साहित्य परंपरेचा गौरव आपल्या दीर्घ भाषणात केला. एका शेतकरी मातेचा पुत्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, या गोष्टीची जाणीव ठेवून मी शासनाकडे कळकळीची विनंती करतो आहे की, लाडक्या बहिणींप्रमाणेच मातीशी झूंज घेऊन धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मराठी साहित्यसृष्टीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी ‘भाषा मराठी, हीच आमच्या ललाटी’ अशी शपथ घेऊन माय मराठी वाचवण्याचे आवाहन करत मुंबईतील मराठी शाळा वाचवाव्यात, पुस्तकांवरील 18 टक्के जीएसटी रद्द करावा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर मराठी पुस्तके विक्रीला प्रोत्साहन द्यावे, ग्रंथालय सेवकांचे मानधन वाढवावे, अशा मागण्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारसह सर्वांचेच अपयश असून राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नाकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विनोद कुलकर्णी यांनी साताऱ्यात संमेलनाच्या आयोजनाने एव्हरेस्ट सर केल्याची भावना सातारकरांमध्ये असल्याचे सांगितले. संमेलनाच्या इतिहासात पिता आणि पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा विक्रम साताऱ्याने केला आहे. शिवेंद्रराजे पाठिशी नसते तर संमेलन आयोजित करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसते, असेही ते म्हणाले. मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, डॉ. मृदुला गर्ग यांची भाषणे झाली. यावेळी अटकेपार या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वागत केले. आभार सुनीताराजे पवार यांनी मानले.

वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष हा योगायोग : शिवेंद्रराजे

स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, सुमारे 12 वर्षांच्या प्रयत्नानंतर साताऱ्याला साहित्य संमेलनाचा मान मिळाला. संमेलन हा पहिला टप्पा असून साहित्य चळवळ वर्धिष्णू होण्यासाठीच्या प्रयत्नांची ही खरी सुरूवात आहे. आजी राजमाता सुमित्राराजे भोसले यांची आठवण काढताना त्यांनी कला, संस्कृती, साहित्याला कायम प्रोत्साहन दिले. तोच वारसा वडील स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी पुढे नेला. 66 वे संमेलन घेतले. त्यावेळी ते स्वागताध्यक्ष होते. आज 99 वे संमेलन साताऱ्यात होत असून मी स्वागताध्यक्ष आहे. वडील आणि मुलगा साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष असण्याचा दुर्लभ योगायोग यानिमित्ताने जुळून आल्याचे सांगितले. संभाजीपुत्र शाहू महाराजांचे भव्य स्मारक साताऱ्यात व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची व्यासपीठावरूनच बंडखोरांना फोनाफोनी

संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस हे सतत फोनवर बोलत होते. स्वीय साहाय्यक त्यांना फोन आणून देत होते. भाषण करताना शेवटी सतत फोनवर बोलल्याबद्धल रसिकांची माफी मागितली. आज महापालिका निवडणुकीचा फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच पक्षात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना अर्ज मागे घे, असे सांगत होतो, असे त्यांनी सांगितले.

आज संमेलनात

सकाळी 9 : कथाकथन

सकाळी 10, : परिचर्चा (आजच्या मराठी साहित्याच भयकथा)

सकाळी 11 : मुलाखत (अनुराधा पाटील)

सकाळी 11 ते 1 संवाद बाल-कुमार वाचकांशी

दुपारी 4 : पुस्तक चर्चा

सायं. 4 : परिसंवाद (स्त्री चळवळीची 50 वर्षे)

सायं. 5.30 : परिसंवाद (आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता)

सायं. 6 : परिचर्चा (अभिजात दर्जा नंतरची मराठी : संधी आणि आव्हाने

Advertisement
Tags :

.