राज्यातील सर्व अंतर्गत रस्ते टोलमुक्त होणार : गडकरी
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत राज्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी
प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच दळणवळण व पायाभूत सुविधा प्रकल्पांचे जाळे विणण्यासाठी स्वत: केंद्रीय वाहतूक तसेच महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घातले असून, येत्या 2024 या वर्षात राज्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येणार आहेत. भविष्यात राज्यातील सर्व अंतर्गत रस्तेही टोलमुक्त करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला असून, टोल फ्री प्रवासाला केंद्रातील भाजप सरकारने मंजुरी दिली आहे. हा एकप्रकारे गोमंतकीय जनतेला दिलासा आहे.
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी संध्याकाळी झुआरी नदीवरील आठ पदरी पूल राज्याला अर्पण केल्यानंतर काल आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो आदी उपस्थित होते.
पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम जानेवारीत
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की, पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम जानेवारीत सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून, यासाठी आम्ही स्वत: आग्रही आहोत. राज्याच्या विकासात हा एक महत्त्वाचा प्रकल्प असेल. या 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरचे प्रत्यक्ष काम जानेवारी 2024 च्या अखेरीस सुरू होईल, असेही ते म्हणाले.
मोपा लिंक रोड एप्रिल 2024 पर्यंत
मोपा विमानतळ ते धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मोपा लिंक रोड (एनएच-166 ए) एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण होईल. या पुलाला देशात जास्तीत जास्त उंची असलेला खांब असेल. देशात हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि जगाचे लक्ष वेधून घेणारा प्रकल्प ठरेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
मडगाव पश्चिम बायपासला प्रशासकीय मान्यता
मडगाव येथील पश्चिम बायपास रस्त्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. राज्यातील नेतृत्वानेही यावर सातत्याने भर दिला आहे. म्हणून मडगाव पश्चिम बायपासला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने याचेही काम आता लवकरच सुरू होईल, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.
गोव्याच्या विकासात बंदरांची मुख्य भूमिका राहिलेली आहे. त्यांचा विकास करण्याबरोबरच या बंदरांची कनेक्टिव्हीटी मुरगाव बंदर प्राधिकरणाला जोडणारा महामार्ग एप्रिल 2024 या काळात पूर्ण होईल आणि या कामावर केंद्रीय वाहतूक तसेच महामार्ग मंत्रालयाची देखरेख राहील, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी दिला.
फोंडा तालुक्यातील बोरी या ठिकाणचा जुना पोर्तुगीजकालीन पूल हा दक्षिण व उत्तर गोवा जिह्याचा प्रमुख दुवा म्हणून राहिलेला आहे. या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती व्हावी, यासाठी राज्य सरकारनेही प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे नवीन बोरी पूल राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत आणण्याबरोबरच त्याला तात्पुरती मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री गडकरी यांनी बैठकीत दिली.
रिंग रोड टू कर्ब हायवे कंजेशन (मुंबई - कन्याकुमारी आणि गोवा ा हैदराबाद) यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आल्याचेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.
गोवा-चोर्ला-बेळगाव समांतर रस्त्यासाठी मान्यता
गोव्यातील सांखळी ते खानापूर, बेळगावमार्गे चोर्ला हा समांतर रस्ता पर्यावरण प्रोटोकॉलनुसार बांधला जाणार आहे. या प्रस्तावित महामार्गाचे काम जलद गतीने सुरू करण्यात येणार आहे. गोवा - चोर्ला - बेळगाव या दरम्यानच्या समांतर रस्त्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरच गोमंतकीयांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा नितीन गडकरी यांनी केली. या समांतर रस्त्यामुळे गोवा ा कर्नाटक व महाराष्ट्र या राज्याला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय अनमोड - साखर कारखाना - खांडेपार महामार्गाचे बांधकाम लवकरच सुरू होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
गोव्यासाठी केंद्राची भरीव मदत : मुख्यमंत्री
केंद्रातील भाजप सरकारने गोवा राज्यासाठी नेहमीच भरीव मदत केलेली आहे. केंद्रीय वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही गोव्याच्या विकासासाठी कधीच आपला हात आखडता घेतला नाही. त्यांच्या प्रयत्नामुळे गोव्यात अनेक प्रकल्प मार्गी लागलेले आहेत. अजूनही काही प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. येत्या नवीन वर्षाच्या अखेरपर्यंत राज्याचा सर्वांगीण विकास झाल्याचे आणि लोकाभिमुख प्रकल्प तडीस गेल्याचे दिसेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.