चर्चा ‘महाबली’ची!
बेल्जियम टू उत्तर प्रदेश व्हाया ओडिशा
सध्या उत्तर प्रदेशच्या रस्त्यांवर संथ गतीने चाल करणारा एक शक्तिशाली ट्रक-ट्रेलर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. 308 चाकांचे हे प्रचंड वाहन, 150 टनांपेक्षा जास्त वजनाची रिअॅक्टर यंत्रसामुग्री घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आहे. हा ट्रक-ट्रेलर जिथे जातो तिथे लोकांची औत्सुक्यापोटी झुंबड उडते. तसेच सेल्फी फोटो आणि व्हिडिओही मोबाईलबद्ध केले जातात. पण, हे यंत्र वाहून नेण्यासाठी या 308 चाकांच्या ट्रकची गरज का भासली? त्याला त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचवणे इतके कठीण का आहे? या वाहतुकीसाठी नेमकी काय व्यवस्था करण्यात आली आहे? असे अनेक प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून विशेष चर्चेत आले आहेत. या सगळ्या मुद्यांबाबत उलगडा करण्याचा हा प्रयत्न...
ओडिशाच्या पारादीप बंदरातून लखीमपूर खेरीकडे जाणाऱ्या ट्रक-ट्रेलरचा प्रवास गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. 308 चाकी हा भलामोठा ट्रेलर पाहण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमतात. या ट्रेलरवर एक रिअॅक्टर लादलेला आहे. हा ट्रेलर सध्या वाराणसी-गोरखपूर चारपदरी महामार्गावरून पुढे जात आहे. त्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी, मार्गावरील फलक आणि इतर अडथळे हटविण्याचे किंवा दूर करण्याचे काम वारंवार सुरू असते. मार्गावरील उच्च दाबाच्या ताराही हटविण्यात येतात. या प्रवासादरम्यान दोहरीघाटपर्यंतच्या चौपदरी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारीही करण्यात आली आहे.
हा ट्रेलर ओडिशातील पारादीप बंदरातून लखीमपूर खेरी येथील पीएलए (पॉली लॅक्टिक अॅसिड) प्रकल्पासाठी निघाला होता. सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासात ट्रेलर वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास करत आहे. 40 ते 50 तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा एक चमूदेखील ट्रेलरसोबत प्रवास करत आहे. हा चमू ट्रेलरच्या कामकाजावर तसेच वाटेत उद्भवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक समस्यांवर लक्ष ठेवून आहे. ही यंत्रसामुग्री लखीमपूर खेरी जिह्यातील बलरामपूर साखर कारखान्याच्या कुंभी प्रकल्पापर्यंत पोहोचविण्याचे कंत्राट जेएम बक्षी ग्रुप कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी या जहाजाची वाहतूक ओडिशाहून उत्तर प्रदेशात रस्तामार्गाने करत आहे.
एप्रिलमध्ये बेल्जियमहून रवाना
ट्रक-ट्रेलरवर लादण्यात आलेला रिअॅक्टर या प्रचंड यंत्राचा प्रवास एप्रिलमध्ये बेल्जियममधून सुरू झाला. हा रिअॅक्टर जहाजाने भारताच्या किनारपट्टीवर आणला जात असताना सुमारे एका महिन्याच्या प्रवासानंतर ओडिशातील पारादीप बंदरावर पोहोचला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रस्त्याने वाहतूक करण्याची तयारी सुरू झाली. हे यंत्र मोठ्या संख्येने चाके आणि एक्सल असलेल्या एका विशेष हायड्रॉलिक ट्रेलरवर चढवण्यात आले. हे मशीन ‘पीएलए’ प्रकल्पाच्या बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडच्या कुंभी येथील युनिटकडे जात आहे. त्या ठिकाणी अंदाजे 3,080 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक मोठा बायोपॉलिमर
प्रकल्प उभारला जात आहे. या कारखान्यासाठी ही यंत्रसामुग्री वापरली जाणार आहे. ‘सायक्लायझेशन रिअॅक्टर’ हा या संपूर्ण प्रकल्पाचा सर्वात महत्वाचा भाग आहे.
मशीन नेण्यासाठी ‘महाबली’ची गरज का?
रिअॅक्टरची वाहतूक प्रक्रिया अतिशय जोखमीची असल्यामुळे रिअॅक्टरच्या वाहतुकीसाठी केंद्रीय रस्ते-महामार्ग मंत्रालयाने 10 एप्रिल, 2026 रोजी एक अधिसूचना जारी केली होती. पारादीप बंदरापासून बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड, कुंभीपर्यंतच्या प्रवासाचा मार्ग यात निर्देशित करण्यात आला होता. शासकीय अधिसूचनेनुसार, या रिअॅक्टरचे वजन 163.30 मेट्रिक टन आहे. एवढा जड भार एका सामान्य ट्रकने वाहून नेणे अशक्य असल्यामुळे अनेक अॅक्सल असलेल्या विशेष हायड्रॉलिक ट्रेलरचा वापर करण्यात येत आहे.
308 चाकांचा ट्रक-ट्रेलर...
या वाहतुकीसाठी एकूण 56 मॉड्युलर हायड्रॉलिक ट्रेलरची नोंदणी करण्यात आली. यामध्ये गोल्डहोफर आणि एमएचडीच्या ट्रेलरचा समावेश आहे. या ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या संख्येने अॅक्सल बसविता येतात आणि त्यानुसार त्यांची भार वाहून नेण्याची क्षमता बदलते. तीन-अॅक्सल ट्रेलरची क्षमता 78 टन, चार-अॅक्सल ट्रेलरची 104 टन, सहा-अॅक्सल ट्रेलरची 156 टन आणि आठ-अॅक्सल ट्रेलरची क्षमता 208 टन आहे. मुख्य प्रकारांमध्ये 24 किंवा 24.5 अॅक्सलचा समावेश असतो. यामध्ये अॅक्सलच्या दोन किंवा तीन रांगा आणि प्रत्येक अॅक्सल रांगेत 12 टायर असतात. याचा अर्थ 308 चाके ही केवळ एका ट्रकची नसून, अनेक ट्रेलर जोडून तयार केलेल्या संपूर्ण वाहतूक प्रणालीचा भाग आहेत. हे ट्रेलर मशीनचे वजन वेगवेगळ्या अॅक्सलवर विभागतात.
ओढण्यासाठी व्होल्वो वाहनांचा वापर
► एवढी मोठी ट्रेलर प्रणाली हलविण्यासाठी सरकारी अधिसूचनेत एकूण 21
प्राइम मूव्हर्सची नोंद असून ते सर्व व्होल्वो कंपनीचे आहेत. या वाहतुकीसाठी व्होल्वो एफएच-16 प्राइम मूव्हरचा वापर केला जात आहे.
► व्होल्वो एफएच-16 हे व्होल्वो ट्रक्सचे प्रमुख ट्रक मॉडेल असून ते अवजड कामांसाठी डिझाईन केलेले आहे. हे वाहन अवघड आणि अवजड वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या कामांसाठी डिझाईन केले गेले आहे.
► व्होल्वो ही एक स्वीडिश ट्रक उत्पादक कंपनी असून ती आलिशान बसेस, ट्रक आणि मोठ्या आकाराच्या गाड्यांसारखी अवजड वाहने तयार करते. या कंपनीची स्थापना 1927 मध्ये झाल्याची नोंद आढळते.
व्होल्वो एफएच-16 ची वैशिष्ट्यो
► व्होल्वो एफएच-16 ची सुधारित बांधणी 27 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करण्यात आली आणि मार्च 2021 मध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. या वाहनाचे इंजिन 550 हॉर्सपॉवर, 650 हॉर्सपॉवर आणि 750 हॉर्सपॉवर क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. 750 हॉर्सपॉवर आवृत्ती 3,550 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.
► हे वाहन आय-शिफ्ट गिअरबॉक्सने सुसज्ज असल्याने विविध कामांसाठी वापरले जाऊ शकते. अवजड कामांसाठी, यात जास्त फ्रंट एक्सल भार क्षमता आणि उत्तम स्टियरिंग अँगल आहेत. आव्हानात्मक कामांसाठी 38-टन बोगी देखील उपलब्ध आहे. व्होल्वो ही 1927 मध्ये स्थापन झालेली एक स्वीडिश कंपनी आहे.

ट्रेलरसाठी वेग प्रतितास पाच किमीपेक्षा कमी
सरकारी अधिसूचनेनुसार ट्रेलरसाठी कमाल वेग ताशी पाच किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. ही अतिशय जड आणि मोठी वाहतूक प्रणाली असल्याने तिचा वेग पारंपरिक अवजड वाहनांपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. ती दिवसाला केवळ अंदाजे 10 ते 20 किलोमीटर अंतर कापू शकते.
प्रवासात अनेक आव्हानांचा सामना
रस्त्याने एवढा मोठा माल वाहून नेण्यासाठी मार्गाची आगाऊ तयारी करणे आवश्यक असते. रस्त्याची रुंदी, दुभाजक, खांब, पूल, वीजवाहिन्या आणि इतर संरचना विचारात घ्याव्या लागतात. अनेक ठिकाणी ट्रेलरला जाण्यासाठी वीजवाहिन्या तात्पुरत्या काढाव्या लागल्या. काही पादचारी पुलांचे काही भागही कापण्यात आले किंवा त्यात बदल करण्यात आले. या प्रवासात दोन क्रेन आणि दोन अतिरिक्त ट्रेलरदेखील कार्यरत आहेत. या संपूर्ण वाहतुकीमध्ये 60 हून अधिक कर्मचारी गुंतलेले आहेत.
मार्गात अडथळा आल्यास काय?
सरकारी अधिसूचनेत अनेक नियमही नमूद केले आहेत. जर जाहिरात फलक, खांब, दिशादर्शक फलक किंवा ट्रान्समिशन लाईन्स यांसारखे अडथळे आल्यास ते तात्पुरते काढण्यासाठी किंवा हटविण्यासाठी संबंधित विभागांकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. हे अडथळे काढण्याचा आणि पुन्हा बसविण्याचा खर्च संबंधित कंपनी उचलणार आहे. वाहतूकदाराने प्रत्येक प्रवासाच्या टप्प्यात किमान 10 दिवस आधी संबंधित प्राधिकरणाला पूर्वकल्पना देणे अपेक्षित आहे. संबंधित प्राधिकरण प्रत्येक वाहतुकीची वेळ ठरवून प्रवास सुकर करण्यास हातभार लावत आहे.
चंदौलीमध्ये मोठा व्यत्यय
25 सप्टेंबरला हे प्रचंड वाहतूक वाहन चंदौली जिह्यातील नौबतपूर सीमेवर पोहोचले होते. रस्त्यांची अवस्था आणि वाहनाच्या आकारामुळे त्याचा वेग अत्यंत कमी होता. त्याने चार दिवसांत केवळ 20 ते 25 किलोमीटर अंतर कापले. ट्रकवर लादलेले हे महाकाय यंत्र सामान्य रस्त्यावरून पुढे नेणे अशक्य असल्यामुळे त्यासाठी एक स्वतंत्र मार्ग तयार केल्यानंतर ट्रक-ट्रेलर पुढे मार्गस्थ झाला. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी दुपारी ते वाराणसीला रवाना करण्यात आले. रिंग रोडवरून एक पर्यायी मार्ग तयार करून ते महामार्गावर आणण्यात आले. त्याच्या रवाना होण्याची बातमी मिळताच जवळच्या गावातील मोठ्या संख्येने लोक आणि व्हिडिओ कंटेंट क्रिएटर्सदेखील घटनास्थळी पोहोचले होते.
या महाकाय यंत्राचा प्रवास अनेक महिन्यांपूर्वी सुरू झाला होता. एप्रिलमध्ये, हे यंत्र बेल्जियमहून समुद्रमार्गे भारतासाठी निघाले. सुमारे महिनाभराच्या सागरी प्रवासानंतर ते ओडिशातील पारादीप बंदरात पोहोचले. त्यानंतर त्याला रस्त्याने उत्तर प्रदेशात पोहोचविण्याचे आव्हान सुरू झाले. पारादीपहून हे यंत्र 308 चाकांच्या एका विशेष ट्रकवर चढवून झारखंड आणि बिहारमार्गे उत्तर प्रदेशात पाठविण्यात येत आहे. एकंदर समुद्रातून सुरू झालेला हा प्रवास आता रस्त्यावरून पुढे जात असताना दररोज काही किलोमीटरवर एक नवीन आव्हान उभे राहत आहे. मात्र, या वाहनाची चर्चा केवळ ठराविक लोकांपुरतीच राहिलेली नसून आता सोशल मीडियाद्वारे संपूर्ण देशात होऊ लागली आहे.
- जयनारायण गवस
