For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीरामकृष्णचरित्रातील सर्व प्रसंग परमपवित्र आहेत

06:51 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीरामकृष्णचरित्रातील सर्व प्रसंग परमपवित्र आहेत
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज श्रीकृष्णाच्या नीजधाम गमनानंतर द्वारकेत पुढे काय झाले ते सांगत आहेत. ते म्हणाले, समुद्राच्या उसळत्या लाटांनी द्वारकानगरी जलमय केली. जरी समुद्राने द्वारका संपूर्ण बुडवली असली तरी भगवंतांच्या राहत्या ठिकाणाला त्याने हात लावला नाही कारण तो हे जाणून होता की, येथे हरीचे अस्तित्व कायम असणार आहे. हरीचे जे जे स्मरण करतील त्यांच्या महापातकाचे निर्दालन होते म्हणून सकल मंगलाचे स्थान असलेले हरीचे स्थान त्याने शिल्लक ठेवले. द्वारकेमध्ये आजही त्यांची नित्य पूजा होत असते. द्वारकेमध्ये यादवांच्यापैकी ज्या बाल, वृद्ध, स्त्रिया राहिल्या होत्या त्या सर्वांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला निघाला.

इंद्रप्रस्थाला आल्यावर अर्जुनाने अनिरुद्धाचा पुत्र वज्र ह्याचा राज्याभिषेक केला. हस्तिनापूरचे राज्य परिक्षिताला देऊन द्रौपदीसहित पांचही पांडव महांपथीं जायला निघाले. देवाधिदेव असलेल्या सर्वेश्वराचे मत्स्यकूर्मादि अवतार, त्यांची जन्मकर्मादि नाना चरित्रे ह्यांचे महात्म्य नंतर पुण्यपुरुष गात राहिले. येथून पुढेही ही चरित्रे जे कुणी श्रद्धायुक्त अंत:करणाने गात राहतील ते प्रयागादी समस्त तीर्थाइतके पवित्र होतील. जे श्रद्धायुक्त अंत:करणाने हरीकीर्तन करतील त्यांच्या पवित्रतेला समस्त जगतात तोड राहणार नाही.

Advertisement

पुढे नाथमहाराज म्हणतात, आता ही श्रद्धा कशी असावी हा प्रश्न आपोआपच मनात उभा राहतो. त्याचे उत्तर असे की, धनलोभी माणसाला धनाची किती ओढ आणि आवड असते हे आपल्याला माहित आहे. त्याप्रमाणे भक्ताला हरीकीर्तनाची आवड आणि ओढ असावी. ज्याप्रमाणे माशांना गुळाची अतोनात आवड असते आणि त्या ओढीने त्या गुळाच्या ढेपेकडे धाव घेतात किंवा वंध्या स्त्राrला कधी नव्हे ते मूल झाल्यावर ते काळेबेंद्रे असले तरी तिला त्याची अत्यंत आवड असल्याने तिचे आतडे त्याच्याकडे ओढ घेत असते. तशी भक्ताला कीर्तनाची आत्यंतिक आवड असावी. अशी ज्याला भगवदगुणकीर्तीचे कीर्तन करण्याची किंवा ते ऐकण्याची गोडी लागेल त्याला श्रद्धावान म्हणावे. तो त्याच्यातील सर्व दोषांचे हरण झाल्याने परमपवित्र होतो. परमेश्वराने जरी नाना अवतार धरण केले तरी श्रीरामकृष्णचरित्र व त्यातील सर्वच प्रसंग सोन्यासारखे परमपवित्र आहेत. येथून पुढे नाथमहाराज श्रीकृष्ण चरित्रातील कोणत्या प्रसंगाचे वर्णन केले किंवा ऐकले तर कोणते दोष दूर होतात ते सांगत आहेत. ते म्हणाले, श्रीकृष्णाच्या दह्यादुधाच्याचोरीचे वर्णन केले असता, मन सोन्यासारखे पवित्र होते. कृष्णाच्या व्याभिचारांचे वर्णन करणाऱ्याचे व्याभिचारातून निर्माण होणारे मोठ्यातले मोठे दोष नाहीसे होतात. श्रीकृष्णाने पुतनेचे दुध पिले ह्या प्रसंगाचे वर्णन केले किंवा ऐकले असता श्रद्धाळूंचे सुरापानादि दारुण दोष नाहीसे होतात. रावण जरी राक्षस कुळात जन्माला आलेला असला तरी ब्राह्मण होता. तो नित्य वेदपठण करत असे. तो ब्रह्माचा पणतूच होता. असं जरी असलं तरी त्याच्या पापाचा घडा भरल्याने श्रीरामांनी त्याचा वध केला. हा ब्राह्मणवध नितीन्यायाला धरून असल्याने हे कथानक जो सांगेल किंवा ऐकेल त्याचे ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होईल. धर्मसाह्यकारी श्रीकृष्णाने पांडवांचे रक्षण केले ह्या महाभारतातल्या कथेचे श्रवण केले असता मृत ब्राह्मण उठून बसतात. ह्याचा अनुभव अठरा ब्रह्महत्या माथी असलेल्या जनमेजयाने घेतला आहे. त्याला अठरा पर्वें सांगून मेलेले सर्व ब्राह्मण जिवंत झाले अशी कृष्णकीर्ती परमपावन आहे. श्रीरामकृष्णकीर्ती ऐकणाऱ्यांच्या महापातके नष्ट होतातच, त्याही पुढचे सांगायचे म्हणजे त्यांच्या पायाला चारही मुक्ती वंदन करतात. असा ह्या श्रद्धासंपत्तीचा महिमा किती वर्णन करावा तेव्हढा थोडाच.

क्रमश:

Advertisement
Tags :

.