अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
भारतीय खेळाडूंसमोर अनेक समस्यांची अडचण
वृत्तसंस्था / लंडन
2025 च्या बॅडमिंटन हंगामातील बर्मिंगहॅम येथे मंगळवारपासून अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये विविध देशाचे अव्वल पुरुष आणि महिला बॅडमिंटनपटू सहभागी होत आहे. दरम्यान भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर दुखापती तसेच कामगिरीचे सातत्य अशा समस्या आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंकडून सध्या तरी फारशा चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धांमधील ही स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. ऑलिम्पिक आणि विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जेतेपद मिळविल्या प्रमाणेच या स्पर्धेतील जेतेपदाची गणना केली जाते. गेल्या दोन दशकांपासून बॅडमिंटन इतिहासामध्ये पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांनी विविध स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरीसह अजिंक्ये पदके मिळविल्याने भारतीय बॅडमिंटन क्षेत्राचा दर्जा निश्चितच उंचावला आहे. पण भारताच्या या तिन्ही बॅडमिंटनपटूंना एकदाही अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद मिळविता आलेले नाही. 1980 साली प्रकाश पदुकोन यांनी तर 20221 साली पी. गोपिचंद यांनी या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचा विक्रम केला होता. 2015 व 2022 साली भारताच्या सायना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांना अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याच प्रमाणे त्रिशा जॉली व गायत्री गोपिचंद यांनी दुहेरीत सलग दोनदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
2025 च्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू येथे दाखल झाले आहेत. पण त्यांच्या समोर अनेक समस्या सध्या दिसत आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू गेल्या काही कालावधीत कामगिरीतील सातत्य राखू शकले नाहीत तसेच त्यांना वारंवार दुखापतीची समस्याही चांगलीच भेडसावत आहे. सिंधूला अद्याप दुखापतीची अडचण चांगलीच भासत आहे. एच.एस. प्रणॉयला काही दिवसांपूवीं चिकनगुनियाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या प्रप़ृतीमध्ये अद्याप लक्षणीय सुधारणा होत नाही. लक्ष्य सेनकडून गेल्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे तो अद्याप झगडत आहे. गेल्या महिन्यात सात्विक साईराजच्या वडिलांचे निधन झाले असल्याने तो अद्याप या धक्क्यातून सावरलेला नाही. पी. व्ही. सिंधूला काही दिवसांपूर्वी स्नायु दुखापतीचा त्रास झाल्याने तिने गेल्या महिन्यात आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली होती. आता ही दुखापत बरी झाली असून ती या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना कोरियाच्या किमबरोबर होणार आहे. सिंधूने सलामीची लढत जिंकली तर तिची दुसऱ्या फेरीत गाठ चीनच्या हेन युईशी होईल. लक्ष्य सेनने गेल्या वर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. सेनचा सलामीचा सामना जपानच्या वटांबेशी होईल. 32 वर्षीय एच.एस.प्रणॉयचा सलामीचा सामना फ्रान्सच्या पोपोव्हशी होईल. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांची सलामीची लढत डेन्मार्कच्या व्हेस्टरगार्ड आणि लुंडगार्ड यांच्याशी होईल. महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या संघ आणि यु यांच्याशी होईल. त्याच प्रमाणे आश्विनी पोनाप्पा व तनिशा क्रेस्टो यांचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या जोडीबरोबर होईल. मिश्र दुहेरीत भारताच्या तीन जोड्या सहभागी होत आहेत. महिला एकेरीत माल्विका बनसोड आणि सिंगापूरची जिया मीन यांच्यात लढत होईल.