‘नीट’संबंधी सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग
बिहार-गुजरात-राजस्थान पोलिसांकडून तपास हाती : अटकेतील संशयितांची कसून चौकशी सुरू
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) गुन्हा नोंदवल्यानंतर आता ‘नीट’ पेपर लीक प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवार, 24 जूनला सीबीआयने बिहार, गुजरात आणि राजस्थानमधील नीट पेपर लीकशी संबंधित सर्व प्रकरणे ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने स्थानिक पोलिसांकडून प्रकरणाच्या सर्व फाईल्स ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
नीट परीक्षा अनियमिततेमधील पाच प्रकरणांपैकी मुख्य परीक्षा लीक कट मॉड्यूल प्रकरण हे बिहारमधील आहे. गुजरात आणि राजस्थानमधील प्रकरणे ही फसवणूक किंवा डमी उमेदवार दिल्याच्या घटना आहेत. आता सर्व प्रकरणांचा तपास सीबीआय करणार आहे. नीट पेपर लीक प्रकरणी शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सीबीआयने नियमित गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने आयपीसी कलम 420 - फसवणूक, 406 - विश्वासाचा भंग आणि 120बी - कट रचल्यासंबंधी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आता सीबीआय पथकातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे.
उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले
केंद्रीय अन्वेषण विभागाचे एक पथक 5 मे रोजी झालेल्या परीक्षेमधील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सोमवारी गुजरातच्या पंचमहाल जिह्यातील गोध्रा शहरात पोहोचले. गोध्रा पोलिसांनी 27 उमेदवारांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 8 मे रोजी फौजदारी कट, फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासभंग यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
गोध्रा-राजस्थानचे प्रकरण वेगळे
गोध्रा आणि राजस्थानचे प्रकरण थोडे वेगळे आहे. गोध्रामध्ये उमेदवाराच्या जागी दुसऱ्यानेच परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांनी तेथे छापा टाकून एका शाळेच्या मुख्याध्यापकासह 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून कोट्यावधींची रोकड आणि धनादेशही जप्त करण्यात आले आहेत. तेथे डमी उमेदवार किंवा फसवणूक हा मुद्दा आहे. तरीही तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून त्याचा बिहारशी काही संबंध आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
टेरर फंडिंगचा संशय
नीट पेपर लीक प्रकरणात टेरर फंडिंगचा संशय आहे. महाराष्ट्रातील नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) याप्रकरणी 4 जणांविऊद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यापैकी एकाला रविवारी रात्री लातूर येथून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी रविवारी एटीएसने संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण या दोन शिक्षकांना लातूर येथे ताब्यात घेऊन त्यांची बराच वेळ चौकशी केली होती. यानंतर त्याला सोडून देण्यात आले. यापैकी जलीलला रात्री उशिरा पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
जंतरमंतरवर निदर्शने
नीट परीक्षेतील गोंधळावरून देशभरात आंदोलन सुरू असून ठिकठिकाणी निवेदनांचा पाऊस पडत आहे. याचदरम्यान दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने सुरू झाली आहेत. संसदेला घेराव घालण्याच्या प्रयत्नात आंदोलकांनी पोलिसांचा बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. परीक्षा रद्द करण्याची आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. बॅरिकेड उडी मारणाऱ्या आंदोलकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे.