माणसाच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या हातून सर्व कर्मे घडत असतात
अध्याय पाचवा
भगवंत म्हणाले की, संयमी पुरुष फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या खात्रीने त्याविषयी उदासीन राहतो. त्याला कर्माच्या श्रेयाची अपेक्षा नसते, त्यामुळे त्याचे कुणी कौतुक केल्यास त्याच्याबद्दल प्रेम अथवा त्याची कुणी दखल न घेतल्यास त्याच्याबद्दल राग, द्वेष, मत्सर असे काही त्याला वाटत नाही. तो जिकडे पाहतो, तिकडची सृष्टी सुखमय होते आणि त्याचे सहज बोलणे म्हणजे हितोपदेशच असतो त्यामुळे ते बोधवाक्यच ठरते. देहानुसार वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फळांचा त्याग करणारा असल्याने कर्मे करूनही काहीच करत नाही.
पुढील श्लोकात परमेश्वराबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, कर्तेपणा, कर्म अथवा कर्माचा फलाशी संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही. माणसाच्या स्वभावाप्रमाणे ह्या सर्व गोष्टी घडत असतात.
न कर्तेपण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभू । न कर्मी फल-संयोग स्वभावे सर्व होतसे ।।14।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, परमेश्वर तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करत असला तरी त्याला कर्ता म्हणता येत नाही कारण तो त्या कर्मात गुंतून पडत नाही. त्यामुळे त्याचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. त्याच्या सहज स्थितीचा भंग होत नाही असे असले तरी तो त्याच्या कर्मात कसूर न करता महाभूतांचे समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परंतु त्याला कुणाशी काहीही घेणेदेणे नसते. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते ह्याची त्यास खबरही नसते. हा कर्माचा संन्यास होय.
स्वामी मुकुंदानंद म्हणतात, परमेश्वर आपल्याला कर्म कसे करावे हे सांगत नाही तसेच आपण करत असलेले कर्म चांगले की, वाईट हेही ठरवत नाही कारण जर परमेश्वर आपण कर्म कसे करावे हे ठरवू शकत असेल तर त्याला चांगले कर्म कुठले, वाईट कर्म कुठले हे अर्जुनाला आणि त्यानिमित्ताने आपल्याला गीतेतून सांगत न बसता, आपल्याकडून चांगले कर्म करूनच घेतले असते. आपण स्वत:ला कर्ते समजत असल्याने चांगले कर्म कुठले हे लक्षात यावे म्हणून भगवंतांना गीता सांगावी लागली. आपण कर्ते आहोत ही गैरसमजूत दूर करण्याचा कुणी जर निश्चय केला तर मात्र त्यासाठी परमेश्वर सहाय्य करतात. थोडक्यात आपण कर्ते नाही हा समज दूर करण्याचे काम आपले आहे. आपल्या स्वभावानुसार आपण कर्मे करत असतो. जर स्वभाव सात्विक असेल तर आपल्या हातून चांगली कर्मे घडतील, जर राजस असेल तर आपल्याला कर्माचा व फळांचा हव्यास वाटेल, जर तामस असेल तर आपण कर्म करण्याचा कंटाळा करू.
ज्याला आपला स्वभाव सात्विक व्हावा असे वाटत असेल त्याला मार्गदर्शन करताना लोकमान्य गीतारहस्यात म्हणतात की, माणसाने मिळालेल्या स्वभावाचा स्वीकार करून तो जास्तीतजास्त सात्विक कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी संतांच्या साहित्याचा अभ्यास करावा म्हणजे आपणही त्यानुसार वागावे असे वाटू लागेल. त्यामुळे आपल्या स्वभावात हळूहळू फरक पडत जाऊन तो जास्तीतजास्त सात्विक होत राहील. सात्विक स्वभावाच्या माणसाकडून घडणारी कर्मे ही सात्विकच असतात. संतसाहित्य आपल्याला कुणासाठी काय करायचे ह्याचे मार्गदर्शन करते. त्यानुसार करत असलेली कर्मे निस्वार्थ बुद्धीने केली की, कर्मयोगाचे आपल्याकडून आपोआपच घडते आणि भगवंतांना आणि माउलींनाही तेच अपेक्षित आहे.