Hippurgi Barrage | कोल्हापूरकरांना मोठा दिलासा! कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजचे सर्व २१ दरवाजे उघडले
कोल्हापूर - कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजचे सर्व २१ दरवाजे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पूर्णपणे उघडण्यात आल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा आणि कृष्णेचे पाणी पुढे हिप्परगी ला जाऊन मिळते मात्र तिथे दरवाजे बंद असल्याने मागे या दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण होते. मात्र दरवाजे उघडल्याने संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास हातभार लागणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची आवक झपाट्याने वाढत होती. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीकडे सरकत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर हिप्परगी बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी केली जात होती.
दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा १ जूनपूर्वी दरवाजे उघडण्याची नियमित प्रक्रिया झालेली नव्हती. मात्र, सध्याच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हिप्परगी बॅरेजचे सर्व २१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.