मंगळावर मिळाले एलियन्सचे जीवाश्म
वैज्ञानिकाचा दावा
ब्रह्मांडात असंख्य तारे आणि सौरमंडळं आहेत. अशास्थितीत अनेकदा वैज्ञानिक जेव्हा दुसऱ्या ग्रहांविषयी खुलासा करतात, तेव्हा त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा होते. आमच्या सौरमंडळात असे अनेक ग्रह आहेत, ज्याविसयी माहिती जमविण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. एलियन्स आणि दुसऱ्या ग्रहांवरील जीवसृष्टीच्या शोधात वैज्ञानिक दशकांपासून सहभागी आहेत. अलिकडेच एका वैज्ञानिकाच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. बकिंघम युनिव्हर्सिटीचे रिसर्च फेलो बॅरी डिग्रेगोरिया यांनी वादग्रस्त दावा करत नासाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नासाने मंगळ ग्रहावर टिपलेली खडकांची छायाचित्रे प्रत्यक्षात साधारण खडक नसून तर ‘नरम शरीरयुक्त जीवांचे जीवाश्म आहेत, जे कधी लाल ग्रहावर संचार करत होते असा दावा डिग्रेगोरियो यांनी केला आहे. ही छायाचित्रे मंगळ ग्रहावर प्राचीन जीवनाचा सर्वात मोठा पुरावा आहेत असे त्यांचे सांगणे आहे. डिग्रेगोरियो यांचा दावा हा थेटपणे नासाचा डाटा आणि त्याच्या उद्देशावर सवाल करणारा आहे.
ज्या छायाचित्रांना डिग्रेगोरियो हे एलियन्सचे जीवाश्म ठरवत आहेत, त्या छायाचित्रांना नासाने जारी केले होते. दगडांच्या या अजब आकृत्या केवळ ‘क्रिस्टल ग्रोथ’चा परिणाम असल्याचे नासाचे सांगणे आहे. परंतु डिग्रेगोरियो यांनी नासावर सत्य लपविण्याचा आरोप पेल आहे. नासा 2030 च्या दशकात मंगळावर माणूस पाठविण्याच्या स्वत:च्या योजनेमुळे ही माहिती जगापासून लपवत आहे. या छायाचित्रांमध्ये ज्या आकृत्या दिसत आहेत, त्या पूर्वी कधीच मंगळावर पाहिल्या गेल्या नव्हत्या. नासाने ज्या वेगाने त्या भागाला सोडून रोव्हर पुढे नेला, ते अत्यंत संशयास्पद आहे. या आकृत्यांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास ते स्टिक किंवा छड्यांसारख्या संरचना खडकात विलीन होताना दिसून येतात, जे ट्रेस जीवाश्माचे प्रमुख वैशिष्ट्या असल्याचे डिग्रेगोरियो यांनी म्हटले आहे.
क्रिस्टल कधीच अशाप्रकारच्या शाखांमध्ये विभागत नाही तसेच वळत नाही. ही संरचना पृथ्वीच्या ऑर्डोविशियन काळादरम्यान आढळून येणाऱ्या जीवांसमान असू शकते. नासाला मंगळाच्या मातीत जिवंत सुक्ष्मजीवांच्या अस्तित्वाविषयी पूर्वीच माहित असल्याचा दावा डिग्रेगोरियो यांनी केला.