दाक्षिणात्य दिग्दर्शकासोबत काम करणार आलिया
नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार चित्रिकरण
नाग अश्विनच्या दिग्दर्शनात निर्मित ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळविले होते. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदूकोन आणि कमल हासन यासारख्या कलाकारांनी नटलेल्या या चित्रपटाने 1042.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. नाग अश्विन आता स्वत:च्या आगामी चित्रपटाची तयारी करत असून याकरता आलिया भट्टची निवड करण्यात आली आहे.
आलिया भट्ट सध्या ‘लव अँड वॉर’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. या चित्रपटात ती रणवीर कपूर आणि विक्की कौशलसोबत काम करत आहे. याचे चित्रिकरण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आलिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन यांच्यासोबत काम करणार आहे.
नाग अश्विन हे एका फिचर फिल्मचे नियोजन करत आहेत. या चित्रपटाच्या कहाणीबद्दल सध्या गुप्तता बाळगण्यात येत आहे. आलियाला ही कहाणी पसंत पडली असल्याचे समजते. याच्या चित्रिकरणासाठी तारखा निश्चित केल्या जात आहेत. नाग अश्विन याचबरोबर पुढील वर्षी स्वत:च्या आणखी एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहेत.