For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्जेरियन बॉक्सरच्या विजयाने ऑलिम्पिक नव्या वादात

06:33 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्जेरियन बॉक्सरच्या विजयाने ऑलिम्पिक नव्या वादात
Advertisement

जैविकदृष्ट्या पुरुष असल्याचा ठपका, सोशल मीडियावर संताप, मस्क-रोलिंगचाही सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

‘जैविकदृष्ट्या पुरुष’ असल्याचा ठपका असलेल्या अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफने महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत इटालियन बॉक्सर अँजेला कारिनीचा 46 सेकंदांत पराभव केल्याने पॅरिस ऑलिम्पिक आणखी एका मोठ्या वादात सापडले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून अब्जाधीश इलॉन मस्क आणि प्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यासारख्या नामवंत व्यक्तिमत्त्वांनी टिप्पणी करून त्यात उडी घेतली आहे.

Advertisement

या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप उफाळून आला असून या घटनेचे वर्णन ‘न्यायाची फसवणूक’ आणि ‘दिवसाढवळ्या लूट’ असे करण्यात आले आहे. ब्रिटिश लेखक रोलिंग आणि अब्जाधीश मस्क यांनी देखील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेलीफला स्पर्धेत उतरण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इलॉन मस्क यांनी स्पोर्ट्स होस्ट रिले गेन्सच्या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. ‘पुऊष महिलांच्या खेळात सहभागी होत नाहीत. मी अँजेला कारिनीच्या बरोबर असून चला हे ट्रेंडिंग होऊ द्या’, असे गेन्सने म्हटले आहे. त्यावर मस्क यांनी ‘अगदी खरे’ असे म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (आयबीए) पात्रता निकषांची पूर्ती करत नसल्याने 2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेलीफला अपात्र ठरविले आहे. त्यामुळे वादात आणखी भर पडली आहे. सदर निकष पुऊषांचे ‘एक्सवाय’ गुणसूत्र असलेल्या खेळाडूंना महिलांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित करतात. असे असूनही खेलीफ आणि तैवानचा दुहेरी विश्वविजेता लिन यू-टिंग यांना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण गेल्या वर्षी ‘आयओसी’ने ‘आयबीए’ची मान्यता काढून घेतली.

या गदारोळात खेलीफच्या सहभागाला पाठिंबा देणारे एक विधान ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ने जारी केले असून पॅरिस खेळांच्या बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेणारे सर्व खेळाडू स्पर्धेच्या पात्रता आणि प्रवेश नियमांचे तसेच निर्धारित वैद्यकीय नियमांचे पालन करत आहेत, असे त्यात म्हटले आहे. ‘आयबीए’ने गेल्या वर्षी खेळाडूंना अपात्र ठरवण्याचा घेतलेला निर्णय हा एकतर्फी आणि त्यात योग्य प्रक्रियेचा अभाव होता. हे खेळाडू कित्येक वर्षांपासून उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.