अलेक्झांड्रा, फ्रिट्झ विजेते
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
वॉशिंग्टन ओपनमधील पावसाचा व्यत्यय आलेले अंतिम सामने सोमवारी पूर्ण झाले. यात अलेक्झांड्रा इला डब्ल्यूटीए टूरस्तरीय एकेरीचे विजेतेपद जिंकणारी फिलिपिन्सची पहिली खेळाडू ठरली तर टेलर फ्रिट्झने या हंगामातील आपले पहिले विजेतेपद पटकाविले. महिलांच्या अंतिम सामन्यात, हवामानामुळे खेळ थांबला तेंव्हा 21 वर्षीय इला एका सेटने पिछाडीवर होती. पण दुसऱ्या सेटमध्ये 2-1 ने आघाडीवर होती. सामना पुन्हा सुरू झाल्यावर तिने अव्वल मानांकित जेसिका पेगुलाचा 4-6, 6-4, 6-0 असा धक्कादायक पराभव केला. दुसरीकडे पुरूषांच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित फ्रिट्झने स्पेनच्या किशोरवयीन खेळाडू राफा जोदारचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव केला.
फ्रिट्झने मिळवले हंगमातील पहिले विजेतेपद

दरम्यान, महिलांच्या अंतिम सामन्यात व्यत्यय आणणाऱ्या पावसामुळेच ज्या सामन्याला रात्रभर विलंब झाला होता, त्या लढतीत 19 वर्षीय जोदारवर मात करून फ्रिट्झने या वर्षातील आपले पहिले विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये कोणत्याही खेळाडूची सर्व्हिस ब्रेक झाली नाही. त्यानंतर अमेरिकन खेळाडूने टायब्रेकरमध्ये वर्चव गाजवले. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच त्याने प्रतिस्पर्धंची सर्व्हिस ब्रेक केली आणि स्पॅनिश खेळाडूने नंतर निर्माण केलेल्या दबावाचा सामना करत आपली आघाडी कायम राखली. या विजयामुळे कॅनेडियन ओपनसाठी फ्रिट्झला चांगली गती मिळाली आहे. यूएस ओपनपूर्वीची ही शेवटची एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धा असून यात अमेरिकेच्या पुरूष खेळाडूंचे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद जिंकण्याचे दीर्घकाळापासूनचे अपयश संपविण्यासाठी फ्रिट्झ हा पुन्हा एकदा अमेरिकेच्या प्रमुख आशास्थानांपैकी एक असेल.