अलेक्झांड्रा डॅडारियो घेणार घटस्फोट
एंड्य्रू फॉर्मपासून होणार विभक्त
हॉलिवूड अभिनेत्री अलेक्झांड्रा डॅडारियो आणि एंड्य्रू फार्म यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयासोबत त्यांनी काही काळासाठी यावर सार्वजनिक चर्चा न करण्याची विनंती केली आहे. अलेक्झांड्रा आणि एंड्य्रू यांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही स्वत:च्या अपत्यांचे मिळून पालनपोषण करणार असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
अलेक्झांड्रा आणि एंड्य्रू यांनी जून 2022 मध्ये न्यू ऑरलियन्समध्ये विवाह केला होता. त्यांची भेट कोरोना संकटादरम्यान न्यूयॉर्कच्या एका रस्त्यावर अचानक पणे झाली होती. यानंतर 2021 मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. दांपत्य 2024 मध्ये एका मुलाचे पालक झाले होते. तसेच एंड्य्रूला पहिल्या विवाहापासून दोन अपत्ंय होती. जोर्डाना ब्रियुस्टर ही एंड्य्रूची पहिली पत्नी होती.
अलेक्झांड्राने एंड्य्रूशी संबंधित स्वत:च्या सोशल मीडिया पोस्ट्स आता हटविल्या आहेत. अलेक्झांड्राने वयाच्या 16 व्या वर्षी ऑल माय चिल्ड्रन या टीव्ही शोद्वारे अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तर तिला खरी ओळख ‘पर्सी जॅक्शन अँड द ओलंपियन्स : द लायटनिंग थीफ’ आणि याच्या सीक्वेलमुळे मिळाली होती. यानंतर तिने बेवॉच चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. एचबीओची प्रसिद्ध सीरिज ‘द व्हाइट लोटस’च्या पहिल्या सीझनमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते.