For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आलेक्स सिक्वेरा यांचे मंत्रिपद अडचणीत

12:09 PM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आलेक्स सिक्वेरा यांचे मंत्रिपद अडचणीत
Advertisement

दिगंबर कामतही रडारवर :  नुवेत भाजपला अत्यल्प मते

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात भाजपसाठी मते देऊ न शकलेल्या भाजपच्या काही आमदार, मंत्री व नेत्यांसाठी आता राजकीय धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांचे मंत्रीपदही अडचणीत आले आहे. प्राप्त माहितीनुसार प्रदेश भाजप नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. त्यानुसार काही आमदार, मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नुवेत भाजपला अत्यल्प मते

Advertisement

नुवेचे आमदार व पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या मतदारसंघात भाजपला अत्यल्प मते मिळाली आहेत. जरी हा मतदारसंघ भाजपसाठी कधीही अनुकूल नव्हता तरीदेखील भाजपला जी अपेक्षित होती तेवढी मते मिळालेली नाहीत. भाजपला किमान 5000 मतांची अपेक्षा या मतदारसंघात होती. या मतदारसंघाने काँग्रेसला सुमारे 14 हजार मतांची आघाडी मिळवून दिलेली आहे. भाजपला हा फार मोठा धक्का दक्षिण गोव्यात मिळाल्याने आता मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे.

 दिगंबर कामतही अचडणीत

दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघातही अपेक्षेपेक्षा फारच कमी मते भाजपला मिळाल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ फेररचनेत दिगंबर कामत यांना स्थान मिळण्याची शक्यता दुरावली आहे. कामत यांनी प्रयत्न करूनदेखील मोती डोंगर परिसरातून त्यांना भाजपसाठी मते मिळविता आली नाही. भाजपला मडगावात सुमारे 5000 ची आघाडी अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र एक हजार चारशे एवढी नाममात्र आघाडी मिळाल्याने सध्या मडगावात व भाजप पक्षांतर्गत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

 दिव्या राणेंवर कौतुकाचा वर्षाव

भाजपला सर्वाधिक मते मिळवून देणाऱ्या पर्येच्या आमदार दिव्या राणे यांची चर्चा सध्या पक्षामध्ये होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. त्यांनी श्रीपाद नाईक यांना 19 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले आहे.

 मुस्लिमांनी विश्वजितना केली पाठ

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना वाळपई पालिकेमध्ये मुस्लिम मतदारांनी धक्का दिला असून त्यामुळे मंत्री राणे हे फार नाराज आहेत. आजवर मंत्री राणे यांनी सर्वाधिक कामे या समाजाची केलेली आहेत, परंतु ऐन लोकसभा निवडणुकीत तेथील मतदारांनी पाठ फिरविल्याने व काँग्रेसला मते वाढवून दिल्याने मंत्री राणे फार नाराज झाल्याचे दिसून येते. अन्यथा सत्तरीतून आणखी साडेतीन हजारांची आघाडी मंत्री राणे मिळून देणार होते.

 कळंगुटचीही घेतली गंभीर दखल

कळंगुट मतदारसंघामध्ये देखील आमदार मायकल लोबो यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. मायकल लोबो यांना भाजपने कोणतेही पद गेल्या दोन वर्षात दिलेले नाही, तरी देखील त्यांनी पक्षासाठी प्रयत्न केले होते. त्यांचे हे सारे प्रयत्न वाया गेले आणि कळंगुटमधील जनतेने पुन्हा एकदा भाजपला नाकारले, याची देखील गंभीर दखल भाजपने घेतलेली आहे.

Advertisement
Tags :

.