पश्चिम बंगालमध्ये फेरमतदानही ‘नव्वदी’पार
ईव्हीएममध्ये फेरफार आणि संघर्षाच्या तक्रारींनंतर 15 केंद्रांवर पुन्हा मतदान : आता लक्ष मतमोजणीकडे
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर येथील चार आणि मगराहाट पश्चिम येथील 11 मतदान केंद्रांवर शनिवारी फेरमतदान झाले. येथील एकंदर 15 केंद्रांवर घेण्यात आलेल्या या निवडणुकीतही 90 टक्क्यांवर मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिले. आता मतमोजणी सोमवार, 4 मे रोजी केली जाणार आहे. शनिवारी झालेल्या मतदानावेळी डायमंड हार्बरमधील फाल्टा येथील स्थानिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला आहे. मात्र, आता मतदान प्रक्रियेतील अनागोंदीबाबत कोणतीही घटना निदर्शनास आली नाही.
डायमंड हार्बर येथील चार आणि मगराहाट पश्चिम येथील 11 मतदान केंद्रांवर शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून फेरमतदान सुरू झाले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहिलेल्या प्रक्रियेत मतदारानांनी पुन्हा एकदा उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 1 वाजेपर्यंत डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिममध्ये 55 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. 29 एप्रिल रोजी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान, या मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये फेरफार आणि संघर्षाच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सर्व मतदान केंद्रे दक्षिण 24 परगणा जिह्यात येतात. टीएमसीने कोलकाता खुदीराम अनुशीलन केंद्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोस्टल बॅलेटच्या कव्हर्समध्ये फेरफार करण्यात आल्याचा पक्षाचा दावा आहे. राज्यातील सर्व 294 जागांवर विक्रमी 92.84 टक्के मतदानाची नोंद झाली. 23 एप्रिल रोजी, पहिल्या टप्प्यात 152 जागांवर 93.19 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर 29 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यात 142 जागांवर 92.48 टक्के मतदानाची नोंद झाली.
लाठीचार्ज केल्याचा आरोप
मतदान केल्यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ते शांततेने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जणांच्या पायाला, डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. लोकांनी एका विशिष्ट समुदायावर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर टीएमसी समर्थकांनी घोषणाबाजी केली.
