सावंतवाडीत अल्कोहोलिक्स ऍनॉनिमसचा समूह स्थापन
मद्यपाश मुक्तीसाठी प्रयत्न
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे रविवारी अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस समूहाची स्थापना करण्यात आली. दारु प्यायल्यामुळे विविध शारीरिक आजार जडत असले तरी मुळात दारू पिण्याची अनिवार इच्छा होणे हाच एक आजार असल्याचे प्रतिपादन मनोविकारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी यावेळी केले. एए समूहाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, निरामय विकास केंद्राच्या वंदना करंबेळकर आणि अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस संस्थेचे सभासद उपस्थित होते. डॉ. पाटकर पुढे म्हणाले की, मद्यपाशाचा आजार हा कायमस्वरुपी आजार असून अल्कोहोलिक्स ऍनॉनिमसच्या बैठकांना नियमित हजर राहणे हा त्यावरचा महत्वाचा उपाय आहे. अमेरिकेतील ऍक्रॉन या शहरी १९३५ साली सुरू झालेल्या या संस्थेने लाखो पेशंटना मद्यमुक्त राहण्यास मदत केली आहे. या संस्थेच्या बैठका विनामूल्य असून मद्यमुक्त राहण्याची इच्छा ही या बैठकांसाठी एकमेव अट असते. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे दर रविवारी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस (ए.ए.) च्या नियमित बैठका होतील. ज्यांना मद्यमुक्ती साधायची आहे, त्यांनी या बैठकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एए ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.