जागतिक संकेतामुळे अंतिम सत्रात तेजी
सेन्सेक्स 72 अंकांनी मजबूत : एचडीएफसी बँकेचे समभाग मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात बाजारात नकारात्मक स्थिती राहीली होती. परंतु शुक्रवारच्या सत्रात पुन्हा एकदा जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय बाजार मजबूत राहिला आहे.
यामध्ये देशातील बाजारात नुकसानीची स्थिती राहिली होती. मात्र एचडीएफसी बँक, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, आयटीसी, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात खरेदी विक्री झाल्याने बाजाराला दिलासा मिळाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 72.48 अंकांनी वधारुन निर्देशांक 64,904.68 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 30.05 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 19,425.35 वर बंद झाला आहे.
निफ्टीमधील तेजीसह बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक अनुक्रमे 0.33 टक्क्यांनी आणि 0.38 टक्क्यांनी वधारले आहेत. मुख्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, ओएनजीसी, टेक महिंद्रा आणि टाटा कंझ्युमर यांचे समभाग तेजीत राहिले होते. तर अन्य कंपन्यांमध्ये हिरोमोटो कॉर्प, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचसीएल टेक आणि टायटन यांच्यासारख्या कंपन्यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.गौतम अदानी समूहातील 9 लिस्टेट कंपन्यांमधील तीनचे समभाग तेजीत राहिले आहेत. तर 6 कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
यांच्या कामगिरीने बाजात उत्साह
दिवाळीच्या सणानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून याचा परिणाम हा सकारात्मक होत असातानाच शुक्रवारच्या अंतिम सत्रात जागतिक पातळीवरील घडामोडींचा सकारात्मक परिणाम झाला. यामुळे भारतीय बाजारात बुधवार व गुरुवारच्या घसरणीला विराम देत पुन्हा शुक्रवारी तेजी प्राप्त केली आहे. सर्व घटनांमुळे आगामी आठवड्यात सकारात्मक स्थिती राहणार असून गुंतवणूकदार विविध क्षेत्रांमध्ये आपली गुंतवणूक करण्याकडे त्यांचा कल राहणार असल्याचे संकेतही काही शेअर बाजार तज्ञांनी व्यक्त केले आहेत. मात्र ते कितपत खरे ठरतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.