अल्कारेझ, व्हेरेव्ह विजयी,रुबलेव्ह पराभूत
वृत्तसंस्था/ट्युरीन (इटली)
2024 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे होत असलेल्या एटीपी फायनल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉपसिडेड कार्लोस अल्कारेझने रशियाच्या रुबलेव्हचा पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडले तर नॉर्वेच्या कास्पर रुडला जर्मनीच्या व्हेरेव्हकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्याने या स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याची संधी गमविली. स्पेनच्या अल्कारेझने रशियाच्या रुबलेव्हचा 6-3, 7-6 (10-8) अशा सरळ सेटमध्ये पराभव करुन या स्पर्धेतील आपले विजयाचे खाते उघडले. या स्पर्धेत अल्कारेझचा जॉन निकोंब गटामध्ये समावेश असून या विजयामुळे या गटातील त्याचे स्थान थोडे वधारले आहे. अल्कारेझला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कास्पररुडकडून पराभव पत्करावा लागला होता.
स्पेनच्या अल्कारेझने 2024 च्या टेनिस हंगामात विम्बल्डन आणि फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. अल्कारेझने रुबलेव्ह बरोबरच्या सामन्यात पहिला सेट 38 मिनिटांत जिंकताना सातव्या गेममध्ये रुबलेव्हची सर्व्हिस भेदली. अल्कारेझने पहिला सेट 6-3 असा आरामात जिंकला. पण त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये रुबलेव्हने चिवट लढत देत हा सेटस् टायब्रेकरपर्यंत लांबवला. दुसऱ्या एका सामन्यात जर्मनीच्या अॅलेक्सझॅन्डेर व्हेरेव्हने कास्पर रुडचा 7-6 (7-3), 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. रुडचा पुढील सामना रुबलेव्हशी होणार आहे. इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनेरला या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची नामी संधी असून त्याचा मेदव्हेदेवबरोबर होणाऱ्या सामन्यात एक सेट जिंकणे जरुरीचे आहे. इली नास्तासे गटातून सिनेरयाने सलग तीन विजय नोंदवित आघाडीचे स्थान राखले आहेत.
रोहन बोपन्ना आणि मॅथ्यु एब्डन
या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यु एब्डन यांची उपांत्य फेरी गाठण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. या जोडीला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एल साल्व्हादोरचा मार्सेलो अॅरेव्हेलो आणि त्याचा क्रोएशियाचा साथीदार पेव्हीक यांनी बोपन्ना आणि एब्डन यांचा 7-5, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता बोपन्ना आणि एब्डन यांचाप्राथमिक गटातील शेवटचा सामना जर्मनीच्या क्रेव्हेज आणि पझ यांच्या बरोबर होणार आहे. बोपन्नाने एटीपी फायनल्स ही स्पर्धा यापूर्वी दोनवेळा जिंकली असून गेल्यावर्षी जानेवारीत त्याने एटीपीच्या दुहेरी मानांकनात अग्रस्थान मिळविण्याचा इतिहास घडविला होता. बोपन्नाने वयाच्या 43 व्या वर्षी हा पराक्रम केला.