अल्कारेझने मिळविले वर्षअखेरचे अग्रस्थान
वृत्तसंस्था / ट्युरीन (इटली)
स्पेनचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू कार्लोस अल्कारेझने 2025 च्या टेनिस हंगामाअखेरीस एटीपी मानांकनातील आपले अग्रस्थान निश्चित केले. ट्युरीनमध्ये सुरू असलेल्या एटीपी फायनल्स पुरूषांचा टेनिस स्पर्धेत अल्कारेझने इटलीच्या लोरेंझो मुसेटीचा पराभव करून त्याने हे स्थान पटकावताना सिनरला मागे टाकले.
एटीपी फायनल्स स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात अल्कारेझने मुसेटीचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये दीड तासाच्या कालावधीत पराभव केला. 22 वर्षीय अल्कारेझला वर्षअखेरीस एटीपी मानांकनात अग्रस्थान मिळविण्याची ही दुसरी वेळ आहे. 2022 साली अल्कारेझने वयाच्या 19 व्या वर्षी वर्षअखेरीस एटीपी मानांकनातील अग्रस्थान पहिल्यांदा स्वत:कडे राखले होते.
ट्युरीनमधील स्पर्धेत अल्कारेझने आपल्या गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. इटलीच्या सिनरने जिमी कॉनर्स गटातून आपला तिसरा विजय नोंदवित अग्रस्थान राखले आहे. आता व्हेरेव आणि अॅलिसिमे यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर अल्कारेझचा पुढील फेरीत सामना होईल. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या टेलर फ्रित्झचे आव्हान 7-6 (7-3), 6-3 असे संपुष्टात आणले.