For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, गॉफ, सिनेर, मेदवेदेव्ह तिसऱ्या फेरीत

06:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  गॉफ  सिनेर  मेदवेदेव्ह तिसऱ्या फेरीत
Advertisement

ओसाका, बेरेटेनी, मुलेर पराभूत, बोपण्णा-एब्डन दुसऱ्या फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

येथे सुरू असलेल्या 2024 च्या टेनिस हंगामातील विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, इटलीचा सिनेर, रशियाचा मेदव्हेदेव तर महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. जपानच्या ओसाकाचे आव्हान संपुष्टात आले. पुरूष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यु एब्डन यांनी दुहेरीत विजयी सलामी दिली. मात्र भारताच्या सुमित नागलचे दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्पेनचा विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझने अॅलेक्सझांडेर व्हुकीकचा 7-6 (7-5), 6-2, 6-2 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. अल्कारेझचा तिसऱ्या फेरीतील सामना अमेरिकेच्या फ्रान्सीस टिफोईशी होणार आहे. टिफोईने दुसऱ्या फेरीतील सामन्यात कोरीकचा 7-6 (7-5), 6-1, 6-3 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. इटलीच्या यानिक सिनेरने आपल्याच देशाच्या बेरेटेनीवर 7-6(7-3), 7-6 (7-4), 2-6, 7-6 (7-4) अशी मात करत चौथी फेरी काढली. हा सामना सुमारे 4 तास चालला होता. अन्य एका सामन्यात मिमोर केमॅनोव्हिकने ग्रिकस्पूरचा 4-6, 7-6 (7-5), 1-6, 6-2, 6-3 अशा पाच सेटस्मधील लढतीत पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सिनेर आणि केमॅनोव्हिक यांच्यात तिसऱ्या फेरीतील सामना होईल. रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने मुलेरवर 6-7 (3-7), 7-6 (7-4), 6-4, 7-5 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या एकेरीतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने अॅनेका तोडोनीचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटस्मध्ये एकतर्फी पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. 2019 साली वयाच्या 15 व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत पदार्पण करताना कोको गॉफने व्हिनस विलियम्सचा पराभव केला होता. आतापर्यंत चार वेळा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान दुसऱ्या फेरीतच इमा नेव्हारोने संपुष्टात आणले. नेव्हारोने ओसाकाचा 6-4, 6-1 असा पराभव केला. अमेरिकेच्या कॉलिन्सने क्लेरा टॉसनवर 6-3, 7-6 (7-4) अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. बिट्रेझ हेदाद मायाने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना मॅगडेलिना फ्रेंचचा 7-5, 6-3 असा पराभव केला.

पुरूष दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा आणि एब्डन यांनी पहिल्या फेरीतील सामन्यात रॉबिन हॅस व सॅन्डेर अॅरेंडस् यांचा 7-5, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. पावसाचा अडथळा आल्याने हा सामना 80 मिनीटे चालला होता. मात्र दुसऱ्या एका सामन्यात स्पेनच्या मार्टिनेझ आणि मुनार यांनी भारताचा सुमित नागल व त्याचा सर्बियाचा साथीदार लेजोव्हिक यांचा 6-2, 6-2 असा फडशा पाडत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement
Tags :

.