अल्कारेझ, जोकोव्हिच, मुसेटी, अॅलिसीमे उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस या क्रीडा प्रकारात पुरूष एकेरीत स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, सर्बियाचा जोकोव्हिच, इटलीचा मुसेटी व कॅनडाचा ऑगेर अॅलिसीमे यांनी उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीत चीनची क्वीनवेन व क्रोएशियाची व्हेकीक यांच्यात सुवर्ण पदकासाठी लढत शनिवारी होणार आहे.
पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या माजी टॉपसिडेड अल्कारेझने अमेरिकेच्या टॉमी पॉलचे आव्हान 6-3, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. आता अल्कारेझ आणि कॅनडाचा अॅलिसीमे यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल. दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या जोकोव्हिचने ग्रिकच्या सित्सिपसचा 6-3, 7-6 (7-3) असा पडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. जोकोव्हिच आणि मुसेटी यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल.
पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स अॅलिसीमेने नॉर्वेच्या कास्पर रुडचा 6-4, 6-7 (8-6), 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. दरम्यान इटलीच्या मुसेटीने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हचा 7-5, 7-5 असा फडशा पाडत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या एकेरीत आता चीनची झेंग क्विनवेन व क्रोएशियाची डोना व्हेकीक यांच्यात अंतिम सामना खेळविला जाईल. उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या क्विनवेनने पोलंडच्या टॉपसिडेड स्वायटेकचा 6-2, 7-5 तर दुसऱ्या उपांत्य लढतीत व्हेकीकने स्लोव्हाकियाच्या स्किमेडलोव्हाचा 6-4, 6-0 अशा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
महिलांच्या दुहेरीमध्ये रशियाच्या अॅड्रीव्हा आणि स्नेडर यांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळविताना झेकच्या सिनीयाकोव्हा व क्रेसीकोव्हा यांचा 6-1, 7-5 असा पराभव केला.