For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, सिनेर, पॉल उपांत्यपूर्व फेरीत

06:58 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  सिनेर  पॉल उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

अॅग्युट, गॉफ, जेबॉर, हंबर्ट यांचे आव्हान संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

2024 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझ तसेच इटलीचा जेनिक सिनेर यांनी पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याच प्रमाणे महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ आणि ट्युनेशियाची ओनेस जेबॉर यांचे आव्हान तिसऱ्या फेरीतच समाप्त झाले.

Advertisement

पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने युगो हंबर्टचा 6-3, 6-4, 1-6, 7-5 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. 21 वर्षीय अल्कारेझने या सामन्यात वेगवान सर्व्हिस आणि बेसलाईन खेळावर अधिक भर दिला. अल्कारेझने या लढतीत पहिले सलग दोन सेटस् जिंकल्यानंतर हंबर्टने मुसंडी मारुन तिसरा सेट 6-1 असा जिंकल्याने अल्कारेझवर अधिकच दडपण आले. गेल्या महिन्यात अल्कारेझने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकून एटीपी मानांकनात अग्रस्थान मिळविले. अल्कारेझने ग्रासकोर्ट, हार्डकोर्ट आणि क्लेकोर्टवरील स्पर्धा कमी वयामध्ये जिंकण्याचा पराक्रम केला. आता उपांत्यपूर्व फेरीत अल्कारेझचा सामना 12 व्या मानांकित टॉमी पॉलशी होणार आहे.

इटलीच्या जेनिक सिनेरने चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-2, 6-4, 7-6(9-7) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. गेल्या वर्षी या स्पर्धेत सिनेरने सर्बियाच्या जोकोव्हिचला उपांत्यफेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत सिनेरला पाच सेटस्मधील लढतीत अल्कारेझकडून हार पत्करावी लागली होती. चौथ्या फेरीतील झालेल्या अन्य एका सामन्यात 12 व्या मानांकित टॉमी पॉलने स्पेनच्या रॉबर्टो अॅग्युटवर 6-2, 7-6(7-3), 6-2 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. चौथ्या फेरीतील झालेल्या अन्य एका सामन्यात बल्गेरीयाच्या डिमीट्रोव्हने पायाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या सेटमधूनच माघार घेतल्यामुळे रशियाच्या मेदव्हेदेवला उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली.

महिला एकेरीतील खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात 19 व्या मानांकित इमा नेव्हारोने अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम विजेत्या कोको गॉफचा 6-4, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पोलंडच्या टॉपसिडेड इगा स्वायटेकचे आव्हान तिसऱ्या फेरीतच समाप्त झाल्यानंतर गॉफलाही या स्पर्धेत आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेची मॅडिसन किज हिला चौथ्या फेरीतील सामन्यात खेळताना पायाला दुखापत झाली. दरम्यान कोर्टवर वैद्यकीय इलाज उपलब्ध करुन देण्यात आला. पण या उपचारामुळे तिच्या वेदना कमी न झाल्याने तिला हा सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे जस्मीन पाओलिनीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. पाओलिनी आणि नेव्हारो यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. न्युझीलंडच्या लुलु सनने इमा राडुकानुचा 6-2, 5-7, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 2010 नंतर या स्पर्धेत महिलांच्या विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सन ही न्युझीलंडची पहिली टेनिसपटू आहे. महिलांच्या चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात डोना व्हेकिकने पाओला बेडोसाचा 6-2, 1-6, 6-4 तसेच युक्रेनच्या स्वीटोलिनाने ट्युनेशियाचा जेबॉरचा 6-1, 7-6(7-5), असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.