For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, साबालेंका, गॉफ, जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

06:48 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  साबालेंका  गॉफ  जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम : मेदवेदेव्ह, टॉमी पॉल, म्बोको, मुचोव्हा, बुबलिक पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

2026 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझ, सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविच, ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर, महिलांच्या विभागात टॉप सिडेड बेलारुसची आर्यना साबालेंका, अमेरिकेची कोको गॉफ तसेच अमेरिकेची नवोदित 18 वर्षीय ईव्हा जोव्हिकने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. कॅनडाच्या म्बोको, अमेरिकेचा टॉमी पॉल, कझाकस्तानचा बुबलिक, झेकची कॅरोलिना मुचोव्हा आणि रशियाची युलिया पुतिनसेव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले. झेकच्या मेनसिकने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने जोकोविचला पुढील फेरीत प्रवेश करता आला.

Advertisement

पुरुष एकेरीच्या रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझने अमेरिकेच्या 19 व्या मानांकित टॉमी पॉलचा 7-6 (8-6), 6-4, 7-5 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. या सामन्यात अल्कारेझकडून एकदाही दुहेरी चूक झाली नाही. तर त्याने 70 टक्के आपली सर्व्हिस राखली. अमेरिकेच्या टॉमी पॉलने 2023 साली या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.

अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने कझाकस्तानच्या अॅलेक्झांडर बुबलिकचा 6-4, 6-1, 6-1 असा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हने फ्रान्सीस्को सेरुन्डोलोचा 6-2, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत नवोदित तियानने रशियाच्या अनुभवी डॅनियल मेदव्हेदेवला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता व्हेरेव्ह आणि तियान यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल.

सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोविचला मैदानावर न उतरताच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळाली. झेकच्या मेन्सीकने पोट दुखापतीमुळे चौथ्या फेरीतील सामना सुरु होण्यापूर्वीच माघार घेतल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले. आता जोकोविचला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी इटलीच्या मुसेटी किंवा अमेरिकेच्या टेलर फ्रित्जशी लढत द्यावी लागेल.

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात बेलारुसच्या पाचव्या मानांकित आर्यना साबालेंकाने कॅनडाच्या व्हिक्टोरिया म्बोकोचा 6-1, 7-6 (7-1) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. या लढतीतील पहिला सेट साबालेंकाने केवळ 31 मिनिटांत जिंकताना तीन बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. साबालेंकाने 2023 आणि 2024 साली हि स्पर्धा जिंकली होती. तर गेल्या वर्षी अमेरिकेच्या मॅडिसन किजने हि स्पर्धा जिंकल्याने साबालेंकाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बेलारुसच्या साबालेंकाने यापूर्वी दोन वेळेला अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.

चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने उपांत्यपूर्वी फेरीत प्रवेश मिळविताना झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाचा 6-1, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. गॉफने आतापर्यंत दोन वेळेला ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली असून तिने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत गॉफची लढत स्वीटोलिना आणि अँड्रीव्हा यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल. महिलांच्या विभागातील चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या 18 वर्षीय ईव्हा जोव्हिकने रशियाच्या युलिया पुतीनसेव्हाचे आव्हान 6-0, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 53 मिनिटात संपुष्टात आणत पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता जोव्हिकचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना टॉप सिडेड साबालेंकाशी होईल.

Advertisement
Tags :

.