अल्कारेझ बनला ऑस्ट्रेलिया ओपनचा नवा चॅम्पियन
जेतेपदासह मिळविले करीअर ग्रँडस्लॅम व सातवे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद, जोकोविचचा पुन्हा स्वप्नभंग
वृत्तसंस्था/ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
स्पेनचा अग्रमानांकित कार्लोस अल्कारेझने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून करिअर ग्रँडस्लॅम साधताना येथे झालेल्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचचा पराभव केला. या स्पर्धेचा नवा चॅम्पियन बनलेला 22 वर्षीय अल्कारेझ हा करीअर ग्रँडस्लॅम साधणारा सर्वात तरुण टेनिसपटू बनला आहे. जोकोविचने याआधी 10 वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत पराभूत होण्याची त्याची ही पहिलीच वेळ असून 25 वे विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची त्याची संधी हुकली आहे.
अल्कारेझने पहिला सेट गमविल्यानंतर जोकोविचने विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी जोरदार संघर्ष केला. पण अल्कारेझने त्याच्यावर दबाव कायम राखत अखेर त्याला 2-6, 6-2, 6-3, 7-5 असे हरवित त्याचा स्वप्नभंग केला. विजय निश्चित झाल्यानंतर कार्लोसने रॅकेट हवेत उडवित आनंद साजरा केला. काही क्षणानंतर दोघे नेटजवळ एकमेकांशी हस्तांदोलन करताना जोकोविचने त्याचे अभिनंदन केले. दोघांनीही उपांत्य फेरीत पाच सेट्स रंगलेला चुरशीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वीच्या नऊ स्पर्धांमध्ये अल्कारेझ व सिनर यांनीच जोकोविचला 25 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यापासून रोखले आहे. ही मालिका खंडित करण्यात जोकोविच पुन्हा एकदा अपयशी ठरला. 22 वर्षे 272 दिवस वय असणाऱ्या अल्कारेझने डॉन बज यांचा विक्रम मागे टाकला. बज यांनी 1938 मध्ये फ्रेंच ग्रँडस्लॅम जिंकली त्यावेळी ते 22 वर्षे 363 दिवसांचे होते.
अल्कारेझने आता एकूण सात मेजर स्पर्धा जिंकल्या असून ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच तर विम्बल्डन, फ्रेंच, यूएस ओपन स्पर्धा त्याने प्रत्येकी 2 वेळा जिंकल्या आहेत. स्पर्धेचे ओपन युग सुरू झाल्यानंतर करीअर ग्रँडस्लॅम जिंकणारा तो सहावा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर कार्लोसने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. 21 व्या शतकात केवळ चार टेनिसपटूंनाच करीअर ग्रँडस्लॅम मिळविता आले असून जोकोविच हा त्यातील अलीकडचा खेळाडू आहे. त्याने 2016 मध्ये, राफेल नदालने 2010 मध्ये तर रॉजर फेडररने 2009 मध्ये हा पराक्रम केला आहे. अल्कारेझने त्यांच्या पंक्तीत आता स्थान मिळविले आहे. या चौघांशिवाय रॉड लेव्हर, आंद्रे अॅगास्सी यांनीही हा पराक्रम केला आहे. रॉड लेव्हर यांनी हौशी स्पर्धक म्हणून 1962 मध्ये तर ओपन युगात 1969 मध्ये असे दोनदा करीअर ग्रँडस्लॅम मिळविले होते.
सात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा कार्लोस हा सर्वात तरुण टेनिसपटू बनला असून त्याने 1979 मध्ये सातवे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळविणाऱ्या बियॉन बोर्गला मागे टाकले. त्याने 2022 मध्ये अमेरिका ओपन स्पर्धा जिंकून पहिले प्रमुख स्पर्धा जेतेपद मिळविले. त्यानंतर त्याने 2023 व 2024 मध्ये विम्बल्डन आणि 2024 ल 2025 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्या.