वाहनाच्या धडकेने अळणावरचा तरुण ठार
ग्लोब सर्कलजवळ शनिवारी रात्री घडला अपघात : अपघाती मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का
बेळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेने अळणावर येथील एक तरुण जागीच ठार झाला. शनिवारी रात्री उशिरा ग्लोब सर्कलजवळ ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. विजयकुमार लॉरेन्स डिसोझा (वय 30) राहणार अळणावर (जि. धारवाड) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने ठोकरल्याने डोक्याला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. त्याच्या खिशातील मोबाईलवरून त्याची ओळख पटविण्यात आली. विजयकुमार कामानिमित्त पुण्यात रहात होता. पुणे येथील एका खासगी कंपनीत तो काम करीत होता. अळणावरला जाण्यासाठी शनिवारी रात्री तो बेळगावला आला. उशीर झाल्यामुळे अळणावरला वाहनांची सोय नव्हती. त्याने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून आपण बेळगावला पोहोचलो आहोत, पुढे येण्यासाठी वाहनांची सोय नाही, असे सांगितले होते. रेल्वेस्टेशनजवळील बस स्थानकाकडे जाताना ग्लोब सर्कलजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. विजयकुमार हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. रविवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.