अक्षय कुमारची भाची सिमर बॉलिवूडमध्ये
इक्कीस चित्रपटात मुख्य भूमिका
अक्षय कुमार दशकांपासून चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करून आहे. त्याच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले नसले तरीही त्याची भाची सिमर भाटिया आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिनेश विजान यांच्याकडून निर्मित ‘इक्कीस’ चित्रपटातून सिमर भाटिया बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात सिमरची किंचित झलक पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. तर आता अक्षयने भाचीच्या पदार्पणावरून आनंद व्यक्त केला आहे. माझी चिमुकली सिमी आता लहान राहिलेली नाही. लिव्हिंग रुममधील तिच्या परफॉर्मन्सपासून ‘इक्कीस’मध्ये बिग स्क्रीनपर्यंत तिच्या उपस्थितीमुळे मन भरून आले आहे. चित्रपटात अगस्त्य नंदाचा वावरही भन्नाट आहे. चित्रपटाच्या पूर्ण टीमला शुभेच्छा, असे अक्षयने स्वत:च्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘इक्कीस’ चित्रपटात सिमर भाटिया, अगस्त्य नंदाची प्रेमिका म्हणून भूमिका साकारणार आहे. चित्रपटात लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची व्यक्तिरेखा अगस्त्य साकारत आहे. खेत्रपाल हे 1971 च्या युद्धात वयाच्या केवळ 21 व्या वर्षी हुतात्मा झाले होते. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यातील अगस्त्यच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाचे दिग्दशन श्रीराम राघवन यांनी केले आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.