वेबसीरिजमध्ये अभिनय करणार अक्षय कुमार
ओटीटीच्या जगतात कलाकारांचा प्रवेश वाढत चालला आहे. बॉबी देओलपासून शाहिद कपूर, अजय देवगण आणि सनी देओल यासारख्या कलाकारांनी चित्रपटांसोबत डिजिटल जगतातही सक्रीय होत चाहत्यांना आनंदीत पेले आहे. ओटीटीवर स्टार्स केवळ चित्रपटच नव्हे तर आता वेबसीरिजही करू लागले आहेत. अनेक कलाकारांनंतर आता अक्षय कुमारही स्वत:च्या पहिल्या वेबसीरिजसाठी तयार आहे. ओटीटीवर त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, परंतु आता अक्षय 7 वर्षांपासून रखडलेल्या वेबसीरिजमध्ये काम करणार आहे.
अमेझॉन प्राइम व्हिडिओकडून अक्षय कुमारसोबत ‘द एंड’ या वेबसीरिजची घोषणा अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. 2019 मध्ये झालेल्या या घोषणेनंतर कोरोना संकट आले, डिजिटल प्लॅटफॉर्मवर अजय देवगण आणि रविना टंडनसमवेत अनेक मोठ्या कलाकारांच्या वेबसीरिज यशस्वी ठरल्या नाहीत. यादरम्यान अक्षयची सीरिज ‘द एंड’चे कामही रखडले. परंतु याचा निर्माता विक्रम मल्होत्राने आता सीरिजला नवी दिशा दिली जात असल्याचे सांगितले आहे.
हा प्रकल्प बंद झालेला नाही. याची कहाणी लिहिण्यास वेळ लागतोय, आम्ही त्याला एक नवी दिशा दिली असून नव्या दिग्दर्शनात ती तयार होणार आहे. काळासोबत प्रेक्षकांची पसंतीही बदलत राहते, यामुळे त्यानुसार आम्ही याच्या कहाणीत बदल करत आहोत, असे विक्रमने सांगितले आहे. अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहे. तर अक्षय या वेबसीरिजचे चित्रिकरण लवकरच सुरू करणार असल्याचे मसजते. याचबरोबर तो टीव्हीवर ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.