‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमार
14 वर्षांनी प्रियदर्शनसोबत करणार काम
अक्षय कुमारने अलिकडेच स्वत:चा 57 वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी त्याने स्वत:चा आगामी चित्रपट ‘भूत बंगला’ची घोषणा केली आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन हे 14 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. दोघांनी यापूर्वी 2010 मध्ये प्रदर्शित ‘खट्टा मीठा’मध्ये एकत्र काम केले होते. 14 वर्षांनी प्रियदर्शन यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. हे माझ्यासाठी जणू स्वप्नवत असल्याचे अक्षयने म्हटले आहे. अक्षय कुमारचा भूत बंगला हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी धाटणीचा असून याची निर्मिती अक्षय कुमार आणि एकता कपूर मिळून करणार आहेत. अक्षय कुमारचे चालू वर्षात प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. यामुळे अक्षयला आता एका यशस्वी चित्रपटाची आस लागून राहिली आहे. याचमुळे अक्षयने आता पुन्हा कॉमेडी धाटणीच्या चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे.