For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अक्षतारोपण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले!

10:58 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अक्षतारोपण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले
Advertisement

सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला सुरुवात : पंचक्रोशीत लोटला भाविकांचा जनसागर

Advertisement

वार्ताहर /सांबरा

हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ‘श्री महालक्ष्मी माता की जय’च्या जयघोषात मंगळवारी सकाळी सांबरा येथे श्री महालक्ष्मी देवीचा अक्षतारोपण सोहळा उत्साहात पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर लोटला. त्यामुळे अवघा मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मंगळवारी देवीच्या अक्षतारोपण कार्यक्रमासाठी पहाटे 5 पासूनच भक्त येत होते. यावेळी बघता बघता लक्ष्मी गल्ली, कलमेश्वर गल्ली, माऊती गल्ली आदी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. सर्व विधी झाल्यानंतर ठरलेल्या वेळेत देवीचा अक्षतारोपण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महालक्ष्मी देवीची पूजा व इतर विधी करण्यात आले. हक्कदार घराण्यांकडून ओटी भरण्यात आली. भाविकांनी रांगेत उभे राहून श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष भरमगौडा पाटील, खजिनदार वाय. के. धर्मोजी, सदस्य नागेश देसाई, इराप्पा जोई, सिद्राई यड्डी, कल्लाप्पा पालकर, मुकुंद मुतगेकर, दीपक जत्राटी, मदन अप्पयाचे, विलास खनगावकर, सदाशिव पाटील, प्रभाकर यड्डी, शिवाजी जत्राटींसह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

मूर्ती 1917 सालची

सन 1917 साली महालक्ष्मी देवीच्या यात्रेवेळी बैलहोंगल येथील चित्रगार बंधूंनी महालक्ष्मी देवीची मूर्ती बनविली होती. तीच मूर्ती आजही कायम असून मूर्ती अत्यंत तेजस्वी, मनमोहक व  सौंदर्याने नटलेली आहे. यामुळे भाविक श्रीदेवीचे प्रथम दर्शनी रूप  टिपून घेत आहेत. अक्षतारोपणचा अविस्मरणीय सोहळा भाविकांनी मोबाईलमधून चित्रीत करून घेतला. दुपारी 3 वा. श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या व्हन्नाट (खेळ) ला सुरुवात झाली. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत देवीचा जयजयकार करण्यात येत होता. सायंकाळी देवी रथावर विराजमान झाल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ झाला. चावडी गल्लीतील शिवानंद के. कुलकर्णी यांच्या घरापर्यंत रथ ओढण्यात आला.

रथोत्सवचा बुधवारचा मार्ग

बुधवार दि. 15 रोजी सकाळी 8 वाजता शिवानंद कुलकर्णी यांच्या घरापासून रथोत्सवाला प्रारंभ होणार असून चावडी गल्ली व शुक्रवार पेठपर्यंत रथ ओढण्यात येणार आहे.

सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रा विशेषांकाचे प्रकाशन

दैनिक तरुण भारतच्यावतीने काढण्यात आलेल्या सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रा महोत्सव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि. 14 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रारंभी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूर्व विभाग उपप्रमुख मोहन जोई यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, दैनिक तरुण भारतने संस्कृती टिकविण्याचे कार्य केले आहे. सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई म्हणाले की, दैनिक तरुण भारतच्या यात्रा विशेषांकामध्ये गावासंबंधी व यात्रेसंबंधी सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या सांबरा गावची माहिती सर्वदूर पोहोचली आहे. त्यामुळे दैनिक तरुण भारतचे आम्ही खूप आभारी आहोत. याप्रसंगी श्री महालक्ष्मीदेवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष भरमगौडा पाटील, सदस्य इराप्पा जोई, सिद्राई यड्डी, मदन अप्पयाचे, सदाशिव पाटील, जोतिबा तिप्पान्नाचे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष माऊती जोगाणी, मल्लाप्पा कांबळे, मोहन जोई, गजानन पाटील, पत्रकार युवराज पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.