अकिब नबी इंग्लिश कौंटीसाठी करारबद्ध
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकिब नबीने आगामी न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेच्या दृष्टीकोनातून इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघाशी नुकताच नवा करार केला आहे.
29 वर्षीय अकिब नबीने इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या सरे क्लब बरोबर 3 सामन्यांसाठी करार केला आहे. इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिपमधील डिव्हिजन-1 मधील हे सामने होणार आहे. शनिवारी अकिब नबीला इंग्लंडला जाण्यासाठी अधिकृत व्हिसा मिळाला असून तो लवकरच इंग्लंडला रवाना होईल. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील सरेचा पहिला सामना यॉर्कशायर बरोबर ओव्हल मैदानावर 2 सप्टेंबरला होणार असून या सामन्यात अकिब नबीचा सहभाग निश्चित राहिल. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत तो प्रथमच खेळत आहे.
भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडमधील हवामान तसेच वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव अकिब नबीला अद्याप नाही. त्यामुळे इंग्लंडमधील हवामान तसेच वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा त्याला इंग्लंडच्या दौऱ्यात इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळताना थोडाफार अनुभव मिळू शकेल. श्रीलंकेच्या दौऱ्यावर जखमी बुमराहच्या जागी भारतीय कसोटी संघात अकिब नबीला संधी देण्यात आली होती. पण त्याला या मालिकेत खेळण्याची संधी उपलब्ध होऊ शकली नाही. कारण प्रसिद्ध कृष्णा व मोहम्मद सिराज यांना अंतिम 11 खेळाडूत संधी देण्यात आली होती.
2025-26 च्या क्रिकेट हंगामात 29 वर्षीय अकिब नबीने दर्जेदार कामगिरी करताना 10 सामन्यात 60 गडी बाद करुन पहिल्यांदाच जम्मू काश्मीर संघाला रणजी करंडक मिळवून दिला होता. रणजी स्पर्धेत त्याने सात वेळेला एका डावात पाचपेक्षा अधिक गडी बाद केले. लंकेच्या दौऱ्यावर त्याने झालेल्या दोन प्रथम श्रेणी सामन्यात 6 गडी बाद केले. 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सने अकिब नबीला 8.4 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. मात्र त्याला या स्पर्धेत एकही गडी बाद करता आला नाही.