अकिब जावेद हंगामी प्रमुख प्रशिक्षक
वृत्तसंस्था / लाहोर
पाक क्रिकेट संघाच्या हंगामी प्रमुख प्रशिक्षकपदी माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेदची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पीसीबीच्या प्रवक्त्याने केली आहे. 2025 मध्ये पाक येथे होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेपर्यंत अकिब जावेदकडे प्रमुख प्रशिक्षकपद राहिल.
पीसीबीच्या पुरुषांच्या राष्ट्रीय निवड समितीमध्ये गेली दोन वर्षे अकिब जावेद वरिष्ठ सदस्य म्हणून कार्यरत होता. आता त्याच्यावर ही नवी जबाबदारी पीसीबीने टाकली आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षीच्या 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे.
पाकचा क्रिकेट संघ 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान झिम्बाब्वे विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकांनंतर पाकचा संघ द. आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका 10 ते 22 डिसेंबर दरम्यान खेळणार आहेत. पाकमध्ये तिरंगी वनडे मालिका 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार असून यामध्ये यजमान पाक, न्यूझीलंड आणि द. आफ्रिका यांचा समावेश आहे. अलिकडेच पाक संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर जिंकली आहे.